वाघोली-शिरूर रस्त्याची निविदा पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोली-शिरूर रस्त्याची निविदा पूर्ण
वाघोली-शिरूर रस्त्याची निविदा पूर्ण

वाघोली-शिरूर रस्त्याची निविदा पूर्ण

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. २१ : वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बहुचर्चित अशा या रस्त्याचा डीपीआर बनविण्याच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे.

पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूरचे आमदार अशोक पवार यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, भूसंपादनात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन नागपूरच्या धर्तीवर एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाच्या माध्यमातून सादरीकरण केले होते. त्यानुसार डीपीआर बनविण्याच्या कामाला सुरवातही झाली होती. परंतु, भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून याठिकाणी दुमजली पुलासह १८ पदरी रस्ता बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
या महामार्गाच्या कामाचे सादरीकरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केले होते. मात्र, त्यानंतरही अपेक्षित गतीने काम पुढे सरकत नसल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) निवडीसाठीच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली असून, पीएमसी निवडीसाठीची निविदा प्रक्रियाही पार पडली. कार्यारंभ आदेशानंतर लवकरच डीपीआर बनविण्याच्या कामाला सुरवात होईल.

कामातील बदलामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलेल्या निर्देशानुसार वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया झाल्याने लवकरच डीपीआर बनविण्याचे काम सुरू होईल. तर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड रस्त्याच्या पीएमसी संस्थेसाठीची निविदाही जाहीर झाल्यामुळे लवकरच ही कामे मार्गी लागतील.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

नगर महामार्गावर दररोज असलेला एक लाख वाहनांचा वाहतुकीचा ताण आहे. क्षमतेबाहेरील वाहतुकीच्या ताणामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व भूसंपादनाच्या अडचणीमुळे येथे किमान एकमजली उड्डाणपूल व्हावा, यासाठी सन २०१४ पासून प्रयत्नशील आहे. मात्र, आता दुमजली पूल होतोय, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सोलापुर रस्त्यावरही असाच दुमजली पूल व्हावा, यासाठीही पाठपुरावा सुरु आहे.
- अशोक पवार, आमदार