
''एम नॉनओवेस''वर गुन्हा दाखल करा
कोरेगाव भीमा, ता. १९ : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एम नॉनओवेस अँड इंटेरियर्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपायांबाबत ग्रामपंचायतीने कारखाना तसेच प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही संबंधितांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे नुकत्याच लागलेल्या आगीत दोन कामगार जखमी होऊन मोठी हानी झाली, असा आक्षेप ठेवत कारखान्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वढू बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाकडे केली आहे.
आगीच्या घटनेत हात भाजून जखमी झालेल्या आंचलसिंग व विवेकसिंग या दोन कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याबाबत वढू ग्रामपंचायतीने पोलिस तसेच प्रशासनाला दिलेल्या पत्रानुसार, कारखान्याने पिएमआरडीएकडून घेतलेले परवानगी पत्र, मंजूर बांधकाम प्लॅन, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, फायर सुरक्षा ना हरकत प्रमाणपत्राबाबत मागणी करूनही कारखाना प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. तर पीएमआरडीएनेही कारखान्यात केलेल्या पाहणीत संभाव्य धोक्याची कल्पना दिलेली असतानाही आवश्यक कार्यवाही झाली नाही. तसेच वढू ग्रामपंचायतीनेही आवश्यक सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत कारखाना प्रशासनासह शासनाला पत्र पाठवले, मात्र याबाबत दखल न घेता उलट तक्रारदारांवरच खंडणीचे गुन्हे दाखल केले.
अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वढू बुद्रुक येथील आगीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा नगर महामार्गावर सणसवाडीसारख्या औद्योगिक क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीच्या वा आपघातासारख्या घटनेत जीवित व वित्त हानी टाळण्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुसज्ज अग्निशमन यंत्रणेची तसेच शासकीय ट्रॉमा केअर युनिटची उभारणी सणसवाडीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावी, अशी मागणी डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (डिसीसीआय) च्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. शासनाने याबाबत कार्यवाही केल्यास डिसीसीआयचीही सहकार्याची भूमिका राहील, याबाबत शासनाकडून प्रतिसादाची आम्ही वाट पाहात आहोत, असे डिसीसीआयचे माजी अध्यक्ष, उद्योजक डॉ. प्रकाश धोका यांनी सांगितले.