
वढू-तुळापूरसाठी २९० कोटींचा निधी
कोरेगाव भीमा, ता. २६ : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ व बलिदानस्थळाच्या विकासआराखड्याला स्थगिती नव्हे; तर २९० कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहातच वदवून घेण्यात आमदार अशोक पवार यांना यश आले. त्यामुळे विकास आराखड्याच्या कामाला आतातरी गती मिळणार का? याबाबत स्थानिकांसह शंभुभक्तांना उत्कंठा लागली आहे.
सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडताना आमदार अशोक पवार म्हणाले, ‘‘शिरूर-हवेली मतदारसंघातील श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ आणि बलिदानस्थळाच्या सुमारे २७० कोटी रुपये खर्चाच्या जागतिक दर्जाच्या विकास आराखड्याला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रशासकीय मान्यता दिलेली होती, मात्र सध्याच्या सरकारने यास स्थगिती दिल्याने अद्याप या निधीची तरतूदच झाली नाही. हा रोखलेला निधी वाढवून त्वरित मिळावा.’’
यावर सभागृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करताना, वढू-तुळापूरच्या निधीला स्थगिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, हा निधी वाढवून २९० कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासनही दिले, असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरेगाव भीमा-वढू-चौफुला या रस्त्यासाठी ४४ कोटींची तरतूद केली असून, त्यातील २२ कोटींची कामे सध्या सुरु आहेत. तर, उर्वरित २२ कोटींची कामेही लवकरच सुरु होणार असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले. तर, वढू बुद्रुक ते वढू खुर्द पुलासाठीही भूसंपादनासह सुमारे ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. ही दोन्ही तीर्थस्थळे जोडली जाऊन या परिसराचा आणखी मोठा विकास व्हावा, यासाठी आपटी ते वढू हा प्रशस्त रस्ता व भीमा नदीवर आपटी ते तुळापूर या पुलाचीही मागणी आमदार पवार यांनी केली. तसेच, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने वाघोली ते शिरूर उड्डाणपुलाच्या कामालाही गती देण्याची विनंती आमदार पवार यांनी सभागृहात शासनाला केली.