
वढू बुद्रुक ग्रामस्थांकडून आढळराव यांचा सन्मान
कोरेगाव भीमा, ता. १३ : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळ सुधारित विकास आराखड्यास ३८४ कोटी रुपयांच्या भरीव निधीसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल शंभुभक्त व वढू बुद्रुक ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार मानले. तसेच, येत्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावेत, यासाठी साकडेही घातले.
धर्मवीर शंभूराजेंचे समाधीस्थळ व परिसराचा विकास व त्यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. आढळराव पाटील यांच्या पुढाकारामुळे सुधारित विकास आराखड्यात स्थानिकांच्या सूचनांची दखल घेण्यात आली असून, त्यासाठी निधीतही सुमारे ११५ कोटींची वाढ करून ३८४ कोटींचा सुधारित आराखडा केला असून, त्याचे सादरीकरण येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात येणार आहे.
या कामात आढळराव पाटील यांचे असलेले महत्त्वपूर्ण योगदान तसेच पाठपुराव्याबद्दल वढू बुद्रुक ग्रामस्थ, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती; तसेच शंभू भक्तांच्या वतीने खासदार आढळराव पाटील यांचा सन्मान केला.
या प्रसंगी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे संस्थापक मिलिंद एकबोटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुका उपप्रमुख हरिभाऊ भंडारे, समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, उमेश भंडारे, अक्षय भंडारे, महेंद्र भंडारे, अनिल भंडारे, नीलेश भंडारे, सचिन भंडारे, अरविंद भंडारे आदी उपस्थित होते.