
केसनंदमध्ये बाईक रॅली
केसनंद, ता. १० : केसनंद (ता. हवेली) येथे अखिल केसनंद गाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थांच्या सहयोगातून शाही मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी बाईक रॅलीने शिवज्योत आणण्यात आली. यावेळी हातात भगवे झेंडे घेऊन ढोलताशांचा निनादात ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सरपंच दत्तात्रय हरगुडे व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ स्मारक व शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. महिलांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव पाळणा तसेच सवाद्य ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक, आकर्षक ध्वनी प्रकाश योजनेसह लेझर शो, फटाक्यांची आतशबाजी हे शिवप्रेमींचे आकर्षण ठरले. तर पोवाडे, मर्दानी क्रीडा प्रकारासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाईने करण्यात आली होती. भगव्या कमानी, झालर, झेंडे यांनी वातावरण शिवमय झाले होते. सायंकाळी शाही मिरवणूकीत मोठ्या उत्साहात भगवे फेटे बांधून शिवप्रेमी तरुणाई सहभागी झाली होता. यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. अध्यक्ष अनिल जाधव, धनंजय ढोरे, दिनेश हरगुडे आदींसह उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी उत्तम नियोजन केले होते.
03499