
शिंदेवाडीच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव फेटाळला
केसनंद, ता. १५ : शिंदेवाडी (ता. हवेली) येथील सरपंच संदीप पाटीलबुवा जगताप यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला.
सात सदस्यसंख्या असलेल्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी सरपंच संदीप जगताप यांच्या विरोधात विविध आक्षेप नोंदवत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत चर्चा व मतदान घेण्यात आले. या चर्चेत सदस्यांनी अविश्वासासह मनमानी कारभाराबाबत केलेले विविध आरोप सरपंचानी स्पष्टपणे नाकारले. त्यानंतर ठरावासाठी घेण्यात आलेल्या मतदानप्रक्रियेत अविश्वास ठराव पारित होण्यासाठी तीन चतुर्थांश म्हणजेच किमान सहा मतांची गरज असताना ठरावाच्या बाजूने केवळ पाच जणांनी मतदान केले. तर, दोन जणांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे हा ठराव आवश्यक मतांअभावी नामंजूर केला.