
यवत येथे कीटकनाशकांचा साठा सील
केडगाव, ता. ५ : एफएमसी इंडिया कीटकनाशक कंपनीने विक्री परवाना दिलेला नसतानाही अकोला येथील महेश एन्टरप्रायझेसकडून कंपनीच्या कोराजन कीटकनाशकांची विना परवाना विक्री होत आहे. कंपनीच्या विक्री व्यवस्थापकाने विना परवाना विक्री केल्याबद्दल महेश एन्टरप्रायझेसविरूद्ध यवत पोलिसात तक्रार दिली आहे. दौंड तालुक्यातील दोन दुकानदारांकडे ही कीटकनाशके सापडल्याने त्यांच्या दुकानातील साठा सील करण्यात आल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली.
वैभव तांबे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी राहुल माने, कृषी अधिकारी एन. टी. जरांडे यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. बोरीपार्धी येथील नितीन एजन्सी व केडगाव येथील नागेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानात महेश एन्टरप्रायझेस यांच्याकडून खरेदी केलेल्या कीटकनाशकांचा साठा आढळला. त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. भरारी पथकाच्या मार्फत कीटकनाशकांची गुणवत्ता तपासणी व प्रिंसिपल सर्टिफिकेटची पूर्तता होईपर्यंत संबंधित कीटकनाशकांची विक्री करू नये, असा आदेश कृषी खात्याने विक्रेत्यांना दिला आहे. साठ्याच्या वैधतेबद्दल एफएमसी कंपनीचे विक्री व्यवस्थापक सचिन ढोबळे यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
तांबे म्हणाले, महेश एन्टरप्रायझेसकडून विक्री परवाना अद्याप सादर झालेला नाही. एफएमसी कंपनीने हे आमचे उत्पादन नसल्याचे कळविले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महेश एन्टरप्रायझेसकडून सांगण्यात आले की, आम्ही एफएमसी कंपनीचा ओरिजनल माल परवान्यासह विकत आहोत. किटकनाशकाची प्रयोगशाळेत तपासणी करावी. दोषी आढळलो तर कारवाईला सामोरे जाऊ. आम्ही होलसेलमध्ये माल उचलत असल्याने कीटकनाशक आमच्याकडे स्वस्त मिळते. त्यामुळे शेतकरी व दुकानदारांचा फायदा होत आहे. दौंडमधील दुकानदारांना जीएसटीचे बील दिलेले आहे. सचिन ढोबळे यांची ती वैयक्तीक तक्रार आहे ती कंपनीची अधिकृत तक्रार नाही.
‘आम्हाला नाहक त्रास’
याबाबत विक्रेते नितीन एजन्सी व नागेश्वर कृषी सेवा केंद्रातून सांगण्यात आले की, कीटकनाशक मूळ कंपनीचेच असून एफएमसी कंपनीचा आमच्याकडे विक्री परवाना आहे. त्या औषधांची जीएसटीचे बिले आमच्याकडे आहेत. शेतकऱ्यांना जीएसटीचे बिल दिले जात आहे. आमचा यात काहीही दोष नसताना आम्हाला नाहक त्रास होत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b00990 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..