दापोडीत झेंडावंदन कोण करणार याकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोडीत झेंडावंदन कोण करणार याकडे लक्ष
दापोडीत झेंडावंदन कोण करणार याकडे लक्ष

दापोडीत झेंडावंदन कोण करणार याकडे लक्ष

sakal_logo
By

केडगाव, ता. १३ ः जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश न मानल्याने दापोडीच्या सरपंच नंदा भांडवलकर यांना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पदावरून हटविले असून उपसरपंच अशोक नरूटे यांनी सादर केलेला राजीनामा पुन्हा मागे घेतला आहे. यापूर्वी उपसरपंचपदावर राहिलेल्या मंजुश्री रूपनवर यांनी उच्च न्यायालयातून जैसे थे चा आदेश आणल्याने नरूटे यांचे पद धोक्यात आले आहे. या राजकीय पेचामुळे स्वातंत्र्यदिनाला झेंडावंदन कोण करणार याची चर्चा गावात रंगली आहे.
दापोडी उपसरपंचपदाची निवडणूक घेऊ नका असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेला असतानाही या आदेशाकडे दुर्लक्ष करत सरपंच नंदा भांडवलकर यांनी उपसरपंचपदाची निवडणूक घेतली. भांडवलकर यांनी अट्टहासाने उपसरपंचपदाची निवडणूक घेतली असून त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचे पालन न करून गैरवर्तणूक केल्याचे निकालात नमूद करत भांडवलकर यांना सौरभ राव यांनी पदावरून हटविले आहे. स्वतःचे उपसरपंचपद गेल्याने मंजुश्री रूपनवर यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे धाव घेतली होती. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी निवडणूक थांबविण्याचा आदेश दिला होता. ऑक्टोबर २०१७मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत गटातटाच्या राजकारणामुळे विकासकामे समाधानकारक झाली नाहीत. हेवेदावे आणि माहिती अधिकाराचा मोठ्या प्रमाणात वापर, शासकीय जागेवरील अतिक्रमणे हे नेहमीच वादाचे मुद्दे राहिले आहेत. गावातील हेवेदाव्यांमुळे गेल्या पाच वर्षात सहा ग्रामसेवक बदलले आहेत. याचा परिमाण विकासकामांवर झाला आहे. अडीच कोटीची पाणी योजना सक्षमपणे चालत नाही. भटक्या जमातीतील रहिवाशांच्या तीन तीन पिढ्या येथील गायरान जमिनीत राहत आहेत. तरी त्यांच्या घरांच्या नोंदी अद्याप लागलेल्या नाहीत. दरम्यान, राजकीय सुडापोटी मला पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. मात्र आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे असे सरपंच नंदा भांडवलकर यांनी नमूद केले आहे.
झेंडावंदन बरोबर गावातील यापुढील कामकाज कोण पाहणार असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जानेवारी २०२३ मध्ये सरपंचपदाचा कार्यकाळ संपणार आहे. याबाबत दापोडीचे ज्येष्ठ माजी सरपंच जगन्नाथ चव्हाण म्हणाले, ‘‘सरपंच व प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून काम केले नाही. या दोन्ही पदांबाबत आता उच्च न्यायालयातून मार्ग निघू शकतो. इतका पेच मोठा आहे. ग्रामपंचायत कामकाजात गावातील प्रस्थापितांचा कमालीचा हस्तक्षेप आहे. हा सर्व पेच त्यांच्यामुळे निर्माण झाला आहे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b01021 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..