
राज्यातील सरकार धमक्या देणारे : सुप्रिया सुळे
केडगाव, ता. २७ : ‘‘आमची लढाई ही व्यक्तीशी नाही, तर विचारांशी असून घराणेशाही असल्याचा मला अभिमान आहे. राज्यात असलेले सरकार हे धमक्या देणारे सरकार असून, विकासकामांवर बोलायला कोणी तयार नाही. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड असंतोष आहे,’’ अशी टाकी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पारगाव (ता. दौंड) येथे गावभेट दौऱ्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील सुसंस्कृत महाराष्ट्र फक्त महाविकास आघाडी सरकारच बनवू शकते. त्यामुळे मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेली विकासकामे व विविध लोकउपयुक्त योजना लोकांपर्यंत पोहोचवा. महाविकास आघाडीने केलेली काम लोकांच्या स्मरणात आहेत. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने दीड लाख तरूणांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या आहेत. याचा जाब सरकारला द्यावा लागेल.’’
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकारने खासदार सुळे यांना पाच वेळा संसदरत्न पुरस्कार दिला. त्याच भाजपचे मंत्री बारामतीत येऊन विकासकामांबाबत टीका करत आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत. गावोगावी राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे, परंतु गटबाजीने विरोधकांना फायदा होत आहे. यापुढे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून एकदिलाने निवडणुकांना सामोरे जायचे आहे.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारने घेतलेले चांगले निर्णय हे सरकार रद्द करत आहे. आपण केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे.’’
यावेळी वैशाली नागवडे, पांडुरंग मेरगळ, राणी शेळके, सारिका पानसरे, सयाजी ताकवणे, पोपटराव ताकवणे, सर्जेराव जेधे, नितीन दोरगे, सुभाष बोत्रे, गणेश थोरात, राहुल दिवेकर, योगिनी दिवेकर, विकास खळदकर, रामभाऊ टुले, संभाजी ताकवणे, नानासाहेब जेधे, अजित शितोळे, किरण मोरे, आश्लेषा शेलार, नीलेश ताकवणे, स्वरूप ताकवणे आदी उपस्थित होते.