दौंड तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम
दौंड तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम

दौंड तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम

sakal_logo
By

दौंड तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम

आरोग्यदूत, आदर्श संसदपटू आमदार राहुल कुल यांचा आज वाढदिवस... विकासकामात त्यांचा आवाका मोठा आहे. मंत्रिपद मिळाले नसले, तरी ती खंत न बाळगता त्यांनी कामात झोकून दिल्याचे दिसते. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य असे चौफेर काम करणाऱ्या राहुल कुल यांच्याशी वाढदिवसानिमित्त साधलेला संवाद...

- रमेश वत्रे, केडगाव

प्रश्न : सत्ता बदलाचा दौंड तालुक्यावर काय परिणाम होईल?
आमदार राहुल कुल : दौंड तालुका नैसर्गिक वरदान लाभलेला तालुका आहे. सत्ता बदलाचा सकारात्मक बदल आगामी काळात पाहायला मिळेल. पायाभूत सुविधा निर्माण करून तालुक्याच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी आगामी अडीच वर्षात काम केले जाईल.

प्रश्न : प्रांत ऑफिस, सत्र न्यायालय, क्रीडा संकुल हे प्रश्न प्रलंबित आहेत...
: प्रांत कार्यालयाचे सन २०१९ पासून अधिसूचना काढणं बाकी होतं. येत्या महिनाभरात हरकती सूचना होतील आणि पुढील तीन महिन्यात प्रांत कार्यालय सुरू होईल, असा माझा प्रयत्न आहे. सत्र (जिल्हा) न्यायालयाच्या बाबतीत सन २०१९ ला फाइल जिथं होती, तिथंच ती फाइल होती. त्याचं उत्तर मी देणार नाही. सत्ता बदलानंतर त्याचा प्रवास सुरू झाला आहे. वर्षभरात न्यायालय सुरू होईल, याचे नियोजन मी केलेले आहे. चार विभागांकडील क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करत दौंड शहरालगतची कृषी विभागाकडील साडेआठ एकर जागा क्रीडा खात्याला दिली आहे. संकुलाच्या साडेआठ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दीड कोटी रुपयांच्या कंपाउंडचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे.

प्रश्न : मुळशीच्या पाण्याचा प्रश्न आगामी अडीच वर्षात मार्गी लागेल?
: मुळशीच्या पाण्याची मागणी करणारा मी पहिला आमदार आहे. खडकवासला धरण साखळीवर पुणे शहरचा व बेकायदेशीर पाणी वापराचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. ‘पीएमआरडीए’ वाढत आहे. पिण्याच्या पाण्याला खडकवासला हा पर्याय नसून, त्याला इतर पर्याय शोधले पाहिजेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन समित्या मुळशी धरणासाठी स्थापन केल्या होत्या. त्यावर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. या कामाची व्याप्ती फार मोठी आहे. कर्नाटक, महाराष्ट्र पाणी लवादापासून या प्रश्नाला अनेक कोन आहेत. कायदेशीर चौकटीत हा प्रश्न बसवून त्यावर येत्या वर्षभरात निर्णय अपेक्षित आहे. मुळशी धरणातील पाण्यामुळे दुसरी हरित क्रांती होईल. पुढील १०० पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.

प्रश्न : कुरकुंभ मोरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील इतर विकासकामांबाबत काय सांगाल...
: कुरकुंभ मोरीचे किरकोळ काम राहिले आहे. येत्या महिनाभरात मोरी सुरू होईल. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन स्मशानभूमी, फिश मार्केट, पिकअप स्टँड, विश्रांतीगृह, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, भाजी मंडईची कामे मार्गी लावली आहेत. शहरातील मुख्य रस्ता अष्टविनायकमधून पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बुद्ध विहाराच्या कामाला मान्यता मिळाली आहे. एसआरपी आणि पोलिस प्रशिक्षक केंद्र येथे २०० कोटीची कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करणार आहोत. दौंड नगरपालिका, डीवायएसपी कार्यालय, दौंड पोलिस स्टेशन यांच्या इमारतींचे प्रस्ताव आपण दाखल केलेल आहेत. यवत पोलिस ठाण्याला साडेतीन कोटी रुपये मंजूर झालेत. जागेचा प्रश्न सुटला की कामाला सुरवात होईल. ‘सत्ता प्रकार ब’ हा किचकट विषय आपण कायदेशीर चौकटीत बसवून मार्गी लावला आहे. दौंड बायपास (३५ कोटी), दौंड-गार पूल (२० कोटी), गोपाळवाडी बायपास (२५ कोटी) असा ऐतिहासिक निधी शहरासाठी आलेला आहे. दौंड ग्रामीण रूग्णालयाचे ३३ कोटी रुपयांचे काम सुरू असून, ते प्रगतिपथावर आहे. दौंड-गोपाळवाडी-कुरकुंभ एमआयडीसी हा रस्ता सुस्थितीत आणत आहोत. पुढील पंधरा दिवसात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दौंडला येत आहेत. त्यांच्या भेटीत दौंडला उपनगराचा दर्जा देण्याबरोबर रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लावत आहोत.

प्रश्न : न्हावरे-चौफुला रस्त्याचे काम कधी सुरू होईल?
: राज्य सरकारकडील या रस्त्याच्या रुंदीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण होत आली होती. परंतु, माझ्या प्रयत्नामुळे हा रस्ता महामार्गात समाविष्ट झाला. त्यामुळे हा रस्ता आता केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारची जुनी प्रक्रिया रद्द करून केंद्राची नवीन प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे वेळ लागला. या रस्त्याच्या कामाचे टेंडर व ठेकेदार पण फायनल झाले आहे. रस्त्याचे ड्रॉइंग व डिझाईनचे काम आता चालू आहे.

प्रश्न : भीमा पाटस साखर कारखाना खासगी झाला, अशी टीका होत आहे त्याबद्दल.... निराणी कोण आहेत? त्यांचा या धंद्यातील अनुभव काय आहे?
: कारखाना खासगी झाला, अशी टीका आहे, परंतु तो कसा खासगी झाला? हे कोणी सांगत नाही. टीकाकारांनी खासगीकरण मला एकदा कागदावर मांडून दाखवावे. हा कारखाना कायम सहकारीच राहणार आहे, असा माझा दावा आहे. खूप उच्चस्तरावर प्रयत्न करून हा कारखाना सुरू केला आहे. यात देशाचे सहकारमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले आहे. जिल्हा बँकेच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मदत झाली आहे. सहकाराच्या कायदेशीर चौकटीत राहूनच भीमा पाटस कारखाना भाडेतत्वावर चालवायला देण्याचा आताचा निर्णय घेतला आहे. यात शंका बाळगण्याचे कारण नाही. सभासदांनी भीमा पाटस कारखान्याला सहकार्य करावे.
या निमित्ताने निराणी उद्योग समूह आपल्याबरोबर जोडला गेला आहे. साखर धंद्यातील हे मोठे नाव आहे. कर्नाटकात ते रोज ९० हजार टन उसाचे गाळप करतात. आशिया खंडातील सर्वात मोठे इथोनॅालनिर्माते आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर निर्माते आहेत. थोड्याच दिवसात ते प्रथम क्रमांकावर येऊ शकतात, अशी त्यांची क्षमता आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा या संस्थेला होईल.

प्रश्न : आघाडी सरकारच्या काळात निधी मिळण्यात काही अडचणी आल्या का?
: महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याच आमदारांना निधी देण्यात मारामार होती. तरी जी वैधानिक आश्वासन दिली होती. जसे की दौंडचे ग्रामीण रूग्णालय, रस्त्यांची कामे होती. विधानसभेतील विविध आयुधांचा वापर करून शासनाला निधी देण्याला भाग पाडले. कामे थांबणार नाहीत, याची काळजी आपण घेतली आहे.

प्रश्न : पाटस ते हडपसर हा रस्ता पालखी मार्गात घेतला जाणार आहे का?
: मूळ आराखड्यात हा रस्ता आहे. मात्र, ज्या ठिकाणी चौपदरी रस्ते आहेत. तेथील काम थांबले होते. हा रस्ता रुंद करावा, यासाठी माझ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दहा बैठका झाल्या आहेत. या रस्त्याचे डीपीआर करण्याचे आदेश झाले आहेत. हा रस्ता अपघातविरहित व गतिमान होण्यासाठी हायवेचा विभाग यावर काम करत आहे.

प्रश्न : रेल्वेचे विविध प्रश्न आहेत, त्याबद्दल काय सांगाल...
: दौंडला रेल्वेचे उपनगर म्हणून दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा दर्जा मिळाला, तर अनेक प्रश्न सुटतील. रेल्वेमंत्री दानवे हे पुढील पंधरा दिवसात येणार आहेत. त्यावर चर्चा करणार आहोत. दर तासाला लोकल सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दौंडमध्ये रेल्वेचे विविध प्रकल्प आणून दौंडच्या अर्थकारणाला दिशा देण्यासाठी काम करत आहे.

प्रश्न : सार्वजनिक आरोग्य सुविधांबद्दल काय प्रगती आहे?
: दौंडचे ग्रामीण रूग्णालयाचे काम चालू आहे. वरवंडला ग्रामीण रूग्णालय व्हावे, हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यवतला ट्रामा केअर सेंटरची इमारत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना बळकटी देण्यासाठी आरोग्य उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहे.

प्रश्न : ‘पीएमआरडीए’च्या आराखड्यावर नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले?
: मूळ आराखड्यात बदल होतील. परंतु दौंड तालुक्यातील नागरिकांना ‘पीएमआरडीए’पासून असुविधा होणार नाही., याची काळजी घेत आहोत. ज्या सुविधा नियोजित केल्या आहेत, त्या मिळतील.

प्रश्न : स्वातंत्र्यानंतर दौंडला अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. तुमच्यातर हातातोंडाशी आलेला घास आहे. काय वाटते?
: याची खंत सर्वांनाच आहे. परंतु योग आल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाही, असे मानणारा मी आहे. काम करणे माझ्या हातात आहे. योग आणणे माझ्या हातात नाही. मंत्रिपदच असावे, असे काही नाही. आमदार म्हणूनही आपण चांगला काम करू शकतो, यावर माझा विश्वास आहे. त्यादृष्टीने काम चालू आहे.