अबब घरपट्टी थकबाकी दीड कोटींच्यावर केडगावात प्रशासन चालविणे अवघड : सुविधा देण्याची ग्रामस्थांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अबब घरपट्टी थकबाकी दीड कोटींच्यावर 
केडगावात प्रशासन चालविणे अवघड : सुविधा देण्याची ग्रामस्थांची मागणी
अबब घरपट्टी थकबाकी दीड कोटींच्यावर केडगावात प्रशासन चालविणे अवघड : सुविधा देण्याची ग्रामस्थांची मागणी

अबब घरपट्टी थकबाकी दीड कोटींच्यावर केडगावात प्रशासन चालविणे अवघड : सुविधा देण्याची ग्रामस्थांची मागणी

sakal_logo
By

केडगाव, ता. २४ : केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी दीड कोटींच्यावर गेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ग्रामस्थांनी घरपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच अजित शेलार यांनी केले आहे.

येथील सहा वॉर्डांत घरांची संख्या साधारण ३५०० असून, लोकसंख्या २५ हजारांपेक्षा जास्त आहे. एका कंपनीसह व्यावसायिक गाळ्यांची संख्या मोठी आहे. केडगावची घरपट्टी व पाणीपट्टीची कर आकारणी ६४ लाख आहे. पाच हजार रुपयांवरील थकबाकीदारांची संख्या ७१५ इतकी आहे. त्यांच्याकडून एक कोटी ३० लाख रुपये कर येणे बाकी आहे. तर पाच हजार रुपयांच्या आतील घरपट्टी असणाऱ्या घरमालकांकडून ३० लाख रुपये थकबाकी येणे आहे. एक एप्रिलपासून थकबाकी व चालू घरपट्टीसह ४२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. तरीही चालू व थकबाकीसह एक कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी दिसत आहे. १३ लाख रुपयांची पाणीपट्टी येणे आहे. ग्रामपंचायतीमध्ये २२ कर्मचारी असून, त्यांना महिन्याला दोन लाख २५ हजार रुपये एवढा पगार द्यावा लागतो.

ग्रामस्थांनी घरपट्टी वेळेवर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. थकबाकीचा आकडा मोठा असल्याने कामे करणे अवघड झाले आहे. वीजबिल, पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती, कचरा उचलणे यावर मोठा खर्च होत आहे. कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी आठ विद्युतपंप आहेत. त्यांचे ७० हजार रुपये महिन्याला वीजबिल भरावे लागते. केडगावातील आठवडे बाजारातील काही व्यापारी हे दापोडी टोलनाका येथे स्थलांतरित झाल्याने बाजारपट्टी कमी झाली आहे. काही व्यापारी गाळेधारक थकबाकीत आहेत.
- अजित शेलार, सरपंच

सुविधा दिल्या तर लोक घरपट्टी भरतील. पावसाळ्यात पाणीटंचाई असते. सार्वजनिक शौचालयाजवळ जाऊ शकत नाही इतकी दुर्गंधी तेथे आहे. कचरा आणि पथदिव्यांची बोंब आहे. स्टेशनच्या पाच व सहा क्रमांकाच्या वॉर्डात गेल्या अडीच वर्षांत एकही काम झालेले नाही. याच वॉर्डातील रहिवाशांना थकबाकीच्या नोटिसा काढल्या जातात. त्यामुळे या वॉर्डातील रहिवाशांची वसुली ८० टक्के आहे. जेथे वसुली आहे तेथील कामेही होत नाहीत. स्टेशन वॉर्डातील निधी इतर वॉर्डांत पळविला जातो. ग्रामपंचायतीने असा दुजाभाव करू नये.
- रूपाली लकडे, गृहिणी

केडगाव (ता. दौंड) : केडगावात स्वच्छतागृह व कचऱ्याची समस्या मोठी आहे.