एनडीएतून निवड झालेला दौंड तालुक्यातील पहिला छात्र सिद्धेश खळदेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनडीएतून निवड झालेला दौंड तालुक्यातील पहिला छात्र 
सिद्धेश खळदेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण
एनडीएतून निवड झालेला दौंड तालुक्यातील पहिला छात्र सिद्धेश खळदेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण

एनडीएतून निवड झालेला दौंड तालुक्यातील पहिला छात्र सिद्धेश खळदेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण

sakal_logo
By

केडगाव, ता. १ ः देवकरवाडी (ता. दौंड) येथील शेतकरी कुटुंबातील युवक सिद्धेश दीपक खळदे याने एनडीएतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या यशाबद्दल त्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.
खळदे कुटुंबीयांना लष्कराची कोणतीही परंपरा नाही. मात्र, सिद्धेश याला लहानपणापासूनच लष्कराचे आकर्षण होते. सिद्धेशने दहावीनंतर औरंगाबाद येथे एसपीआय संस्थेत खास एनडीएसाठीचे भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. येथे त्याला कर्नल उदय पोळ यांचे मार्गदर्शन मिळाले. भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिद्धेशने एनडीएची प्रवेश परीक्षा दिली. त्यात त्याला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. गेली तीन वर्ष कठोर शारिरिक प्रशिक्षणाबरोबरच त्याने पॅरा ग्लायडिंग, नौकानयन, तलवारबाजी, विविध खेळ, घोडेस्वारी, शूटिंग, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले व यशस्वीरीत्या एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केले. एनडीएतून प्रशिक्षण घेणारा सिद्धेश हा दौंड तालुक्यातील पहिलाच छात्र आहे.
नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी मानवंदना स्वीकारली. संचलनानंतर छात्रांनी मोठा जल्लोष केला. हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी आकाशात चित्तथरारक कसरती केल्या. सिद्धेशच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याची आई ज्योती खळदे यांनी देवकरवाडीच्या सरपंच म्हणून काम पाहिले आहे. दीपक खळदे व ज्योती खळदे म्हणाले की, ‘‘मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. लष्करात जाण्याचा सर्वस्वी निर्णय सिद्धेशचा आहे. आम्ही त्याला प्रोत्साहन दिले. एकुलता एक मुलगा असूनही त्याच्या निर्णयाबद्दल आमच्या मनात किंतू परंतु आला नाही. लष्करात जोखीम आहे, असे म्हटले जाते. परंतु, आज जोखीम प्रत्येक क्षेत्रात आहे. सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस सायंकाळी घरी येईल की नाही माहीत नसते, इतकी जोखीम वाढलेली आहे. आमचा मुलगा देशसेवेसाठी जात आहे. याचे मोठे समाधान आहे.’’


राज्यातील ग्रामीण भागातील मुलांचे एनडीएमधील प्रमाण फार कमी आहे. त्यासाठी अवेअरनेस वाढला पाहिजे. स्पष्ट ध्येय, जिद्द, पूर्व तयारी आणि प्रचंड मेहनतीची तयारी असेल तर, एनडीएतील प्रवेश अवघड नाही. अपयश आले तरी निराश न होता वयाच्या २० व्या वर्षापर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता. देशभरातून आठ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यातून ३५० विद्यार्थी निवडले जातात. लष्करात देशसेवेबरोबर सर्वोत्तम लाइफ स्टाइल अनुभवता येते. एसपीआय संस्थेमुळे माझी पूर्वतयारी चांगली झाली.
- सिद्धेश दीपक खळदे