
दौंड तालुक्यात भाजपची बाजी
केडगाव, ता. २१ : दौंड तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपने सहा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले.
आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांचे कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना आव्हान देत असतात. बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती होतात. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, मोठ्या ग्रामपंचायती अशा निवडणुकांत थोरात यांचे कार्यकर्ते वरचढ ठरले आहेत. भीमा पाटस साखर कारखान्याचा कारभार हे एकमेव प्रचाराचा मुद्दा केंद्रस्थानी असायचा. याचा कुल यांना फटका; तर थोरात यांना फायदा होत राहिला. सन २००९ ची विधानसभा, २०१९ लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत कुल यांना अपेक्षित यश साधता आले नाही. याचे एकमेव कारण म्हणजे भीमा पाटस साखर कारखाना होता. कुल यांनी केलेल्या अथक प्रयत्नाने यंदा भीमा पाटस कारखाना चालू झाला. त्यामुळे राहुल कुल यांच्या विरोधातील धार कमी झाली. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळाल्याची चर्चा आहे.
पाटेठाण, नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, लोणारवाडी, बोरीभडक या ग्रामपंचायतीवर कुल यांच्या कार्यकर्त्यांनी सत्ता स्थापन केली. यापैकी नांदूर, बोरीभडक, पाटेठाण आणि देवकरवाडी येथे यापूर्वी रमेश थोरात गटाची सत्ता होती. पाटेठाण ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. मात्र, तेथे या संवर्गातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तेथील पद रिक्त राहिले. पाटेठाण ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही.
सरपंचपदाचे विजयी उमेदवार
लोणारवाडी- प्रतिक्षा हिवरकर, बोरीभडक- कविता कोळपे, नांदूर- युवराज बोराटे, दहिटणे- आरती गायकवाड, देवकरवाडी- तृप्ती मगर (सर्व कुल समर्थक), दापोडी- आबासाहेब गुळमे (थोरात समर्थक), डाळिंब- बजरंग म्हस्के (काँग्रेस).