
पारगाव हत्याकांड जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न
केडगाव, ता. ८ ः पारगाव (ता. दौंड) येथील सात जणांच्या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न चालू असल्याची माहिती तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली.
पारगाव येथे १५ दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकून देण्यात आले होते. सात जणांमध्ये तीन बालकांचा समावेश होता. या घटनेमुळे जिल्हा हादरला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पाच पथके तयार केली होती. या पथकाने एका अल्पवयीनसह सहा आरोपींस तत्काळ अटक केली आहे. या आरोपींची पोलिस कोठडी संपली असून ते आता न्यायालयीन कोठडीत आहे. एका आरोपीच्या शोधासाठी एक पोलिस पथक परराज्यात गेले आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून घटनेच्या अनुषंगाने आवश्यक असलेले सीसीटिव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. साक्षीदार निष्पन्न करण्यात आले आहेत. अपहरण व पुरावे नष्ट करणे ही दोन कलमे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. शास्त्रोक्त पुराव्यांची सांगड घालत दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले जाणार आहे, अशी माहिती धस यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
दरम्यान, या तपासाबाबत नियमांचा आधार घेत, तपासात अडथळा येईल म्हणून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे गुन्ह्याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मृतांपैकी तीन जणांचे दफन केलेले मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले होते.
यवत (ता. दौंड) ः गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले पोलिसांनी जप्त केलेले वाहन.