
चौफुला येथे अपघातात दुचाकीवरील दोघे ठार
केडगाव, ता. १६ : पुणे सोलापूर महामार्गावर चौफुला (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. १६) दुपारी दुचाकी व टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले.
किस्तुरचंद कन्हैयालाल शर्मा (वय ६५) व गिरधारीलाल शिवकरणजी शर्मा (वय ४७, दोघेही रा. नागपूर, मूळ रा. जखेडा, राजस्थान), असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गिरीधारीलाल शर्मा व किस्तुरचंद शर्मा हे दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ सी.एल. ५३९५) चौफुल्याच्या दिशेने येत होते. शर्मा हे महामार्गावरील लक्ष्मीनारायण हॅाटेलसमोर रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या टेम्पोची (क्र. एम.एच. ४२ बी.९५७६) त्यांना धडक बसली. अपघात इतका भीषण होता की टेम्पोने दुचाकीला सुमारे ३०० फुटांपर्यंत फरफटत नेले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने गिरधारीलाल व किस्तुरचंद यांचा जागीच मृत्यू झाला.
टेम्पो चालक विठ्ठल चौधरी (रा. खोर, ता. दौंड) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. शर्मा बंधूंचा कोळशाचा व्यापार होता. या भागात ते वसुलीसाठी आले होते.