दौंडच्या मातीला विकासाची आस!

दौंडच्या मातीला विकासाची आस!

दौंडच्या मातीला विकासाची आस!

दौंड तालुक्याची भौगोलिक रचना ही फुटपट्टीच्या आकाराची आहे. भीमा व मुळा-मुठा नदी, मुठा उजवा कालवा तालुक्यातून गेली असल्याने येथे बारमाही शेतीचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्गामुळे येथील दळणवळण चांगले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी दौंडमध्ये पाहायला मिळते. दौंडमधील मातीची भुरळ अनेकांना पडली आहे. दौंड तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती असला, तरी काळाच्या ओघात शेतीला जोड धंदा म्हणून अनेक व्यवसाय पुढे आले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग क्षेत्रात आपली उंची गाठली आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी पर्यटनाचा व्यवसाय सुरू केला आहे.

- रमेश वत्रे, केडगाव

दिग्गजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी
धौम्य ऋषींच्या वास्तव्यामुळे तालुक्याला दौंड असे नाव पडल्याचे सांगितले जाते. पंडिता रमाबाई, नारायण महाराज यांची ही कर्मभूमी. बालगंधर्वांच्या मामाचे गाव पारगाव असल्याने त्यांचे बालपण येथे गेलेले. क्रिकेट महर्षी दि. ब. देवधर यांची शेती पारगावला होती. त्यामुळे त्यांचे येथे जाणे येणे होते. स्वातंत्र्यसेनानी खा. केशवराव जेधे याच मुशीतील. आमदारकी संपल्यानंतरही घरोघरी जाऊन वृत्तपत्र विकणारे त्यागी व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ पाटसकर याच मातीत तयार झालेले. नाट्य व चित्रपट क्षेत्रात मोठे स्थान असलेले डॉ. जब्बार पटेल हे दौंडचेच. दादोजी कोंडदेव व मलठणचे अतूट नाते. सन १९५७ च्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले सर्जेराव गुंड हे नाट्यमयरीत्या बोर्डाचे अध्यक्ष झाले. तेही दौंडमधील.
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून शेतीला नवी दिशा देणारे मधुकाका शितोळे याच मातीतील. येथील काकासाहेब थोरात यांच्यासारखा एक अल्पशिक्षित कामगार मुंबईत जाऊन आमदार होतो. इथपासून ते दौंडमध्ये शिक्षण घेतलेला मुलगा अमेरिकेतील अॅपल कंपनीचा संचालक बनतो काय. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी दौंडमध्ये पाहायला मिळते.

दौंडच्या मातीची भुरळ
दौंडमधील मातीची भुरळ अनेकांना पडली आहे. हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, स्व. अभयसिंहराजे भोसले, स्व. माजी आमदार शिवाजीराव भोसले, मंत्री स्व. पतंगराव कदम, दादासाहेब जगताप, चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर व दादा जाधवराव, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी खासदार विदुरा नवले व अशोक मोहोळ, डी. वाय. पाटील, परमवीर चक्र विजेते आर. आर. राणे, सर्जिकल स्ट्राईकचे प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व दत्ता गायकवाड यांचा यात समावेश आहे. यांची जन्मभूमी वेगळी असली, तर दौंडच्या मातीची यांना भुरळ पडली आहे. या मान्यवरांची शेती दौंड तालुक्यात आहे.

महामार्गच ठरतोय वरदान
दौंड तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती असला, तरी काळाच्या ओघात शेतीला जोड धंदा म्हणून अनेक व्यवसाय पुढे आले आहेत. दिवसामागून दिवस गेले, तशी कसण्यासाठी शेती कमी पडू लागली. साहजिकच शेतीला पर्याय शोधावे लागले. यातून अनेक शेतकऱ्यांची मुले व्यवसायात उतरली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकाच समाजाचे व्यवसायात वर्चस्व होते. आता परिस्थिती बदलली आहे. आता परप्रांतीय आणि स्थानिक शेतकऱ्यांची मुले यांचे बाजारपेठेतील वर्चस्व वाढत आहे. महामार्गालगत हॅाटेल, वाहन विक्री, गॅरेज, स्पेअरपार्ट विक्री, टिंबर मार्केट, हॅास्पीटल, औषधे बि-बियाणे, वीटभट्टी, पेट्रोलपंप, शैक्षणिक संस्था, रोपवाटिका, फर्निचर, बांधकाम, स्नॅक्स सेंटर अशा विविध व्यवसायात तरुणांना आगामी काळात संधी आहे.

मराठी उद्योजकांचा झेंडा
दौंड तालुक्यात प्रवेश करतानाच म्हेत्रे पॅकेजिंग व दुधाळ इंडस्ट्रीज आपले लक्ष वेधून घेते. या शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग क्षेत्रात आपली उंची गाठली आहे. कासुर्डीत कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अॅड. दौलत ठोंबरे यांनी इंजिनिअरिंग कॅालेज काढले.
यवतमध्ये राजेंद्र खुटवड यांच्या ‘बालाजी ग्रुप’ने वाहतूक क्षेत्रात मोठे जाळे विस्तारले आहेत. यवतमध्ये फुलांची शेतीतून अनेक शेतकऱ्यांनी आपला कुटुंबाचा डोलारा सांभाळला आहे. महामार्गालगत गुऱ्हाळघरे व हॅाटेलची मोठी रेलचेल आहे. पेट्रोलपंपासारखा व्हाइट कॅालरधंदा येथे वाढीस लागला आहे. कुरकुंभ, सहजपूर व भांडगाव येथे विविध कंपन्या स्थापित झाल्या आहेत. कंपन्यांच्या पूरक व्यवसायासाला येथे मोठी संधी आहे. चौफुला येथील उद्योग व्यवसायाने तर मोठा कहरच केला आहे. येथे ऑटोहब, हॅाटेलिंग, मेडिकल हब यांची नुसती रेलचेल आहे. तालुक्यातील सर्वात मोठा वीट व्यवसाय या भागात आहे. वीट व्यवसायाला पूरक धंदे येथे वाढत आहेत. संपूर्ण पुणे शहराला वीट पुरवण्याची ताकद येथील वीट व्यवसायात आहे. काही अपवाद वगळता हे सर्व व्यवसाय काही अपवाद वगळता हे मराठी माणसांचे आहेत.

विमानतळाची संधी खुणावतेय
पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रस्तावित आहे. विमानतळामुळे पुरंदरसह दौंड तालुक्याचा कायापालट होणार आहे. महामार्गालगतचे देऊळगाव गाडा येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. हडपसर ते कासुर्डीपर्यंत दुमजली उड्डाणपुलाची मागणी झाली आहे. त्याची सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता पुणे-सोलापूर महामार्ग व पर्यायाने दौंड तालुक्याला मोठे भवितव्य आहे. यापुढे गरज आहे ती कुशल मनुष्यबळाची. अनेक उद्योजकांची ओरड असते की आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ शकतो, परंतु कुशल मनुष्यबळ मिळत नाही. ज्यांना नोकरी हा एकमेव पर्याय आहे, त्यांनी भविष्याची गरज ओळखत शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

कृषी पर्यटन
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी पर्यटनाचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर ही कृषी पर्यटन स्थळे आहेत. एकदिवसीय सहलीसाठी शहरातील लोकांना ती अतिशय सोईस्कर ठरत आहे. पुणे-सोलापूर महामार्गामुळे प्रवासात कोणतीही अडचण नाही. दिवसभर फिरून सायंकाळी घरी पोहचता येते. त्यामुळे शहरी लोकांच्या त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी पर्यटनाला अनुकूल गोष्टी येथे असल्याने या व्यवसायाने येथे मूळ धरले आहे. अजूनही या व्यवसायात काही येऊ घातले आहे.

औद्योगिक शांतता उद्योगांना पूरक
उद्योग व्यवसाय वाढीसाठी पाणी, वीज, दळणवळण व औद्योगिक शांतता गरजेची असते. या सर्व गोष्टी दौंडमध्ये आहेत. पुणे जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत उद्योगांना सतावणारी गुंडागर्दी नाहीच्या बरोबरीत आहे. दौंड तालुका हा शांत तालुका म्हणून ओळखला जातो. काही अपवाद वगळले तर येथील उद्योगांना स्थानिकांचा अजिबात त्रास नसतो. मात्र, दौंडचा हा जो गुणधर्म आहे, त्याचा पाहिजे असा प्रसार झालेला नाही. त्यामुळे दौंडमध्ये उद्योगवाढीला अजून खूप वाव आहे. इतर तालुक्यांसारखे येथे विविध राजकीय गट-तट नाहीत. त्यामुळे येथे ठराविक नेतेमंडळींची मर्जी सांभाळली की त्यांचे काम होऊन जाते.

रिंगरोड व पालखी मार्गामुळे चेहरा बदलणार
पुरंदर विमानतळाच्या बाजूने संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा जातो. पालखी मार्गामुळे प्रशस्त रस्ते होणार आहे. त्यामुळे दौंड, पुरंदर, हवेली, बारामती या तालुक्यांचा चेहरा बदलणार आहे. पुणे शहराच्या पश्चिम व पूर्व भागातून रिंगरोड होऊ घातले आहे. यामुळे या भागाचे महत्त्व वाढणार आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडीला उद्योग जगत वैतागलेले आहे. आणि आता औद्योगिकीकरणाच्या वाढीस सोलापूर महामार्गाइतकी मोकळीक आता कुठे राहिली नाही. त्यामुळे सोलापूर महामार्गाच्या भविष्यात खूप मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

नर्सरी व्यवसायाला मोठी संधी
उरुळी कांचन परिसरात महामार्गालगत मोठ्या प्रमाणात रोपवाटिका आहेत. या भागातील रोपवाटीकांचे प्रमाण हे भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रपती भवनात असलेल्या गार्डनला उरुळी कांचन परिसरातून रोपे जात असतात. या व्यवसायात मोठ्या संधी आहेत. मात्र, हा व्यवसाय उरुळी कांचनच्या तुलनेत अद्याप दौंड विस्तारला नाही. फर्निचर व्यवसायातही मोठ्या संधी आहेत. पुण्याच्या पूर्व भागातील बहुतांश ग्राहक हा उरुळी कांचन येथील फर्निचर मॅालवर अवलंबून असतो. येथे ग्राहकाला भरपूर ऑप्शन मिळतात. दौंड तालुक्यात केडगाव-चौफुला-पारगाव सोडले; तर गावात फर्निचरची दुकाने दिसत नाही.

पंचतारांकित हॅाटेलची गरज
दौंड तालुक्यात कुरकुंभ, सहजपूर, नांदूर, भांडगाव या भागात औद्योगिकीकरण झाले आहे. कार्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, मालक या भागात येतात, तेव्हा दौंड तालुक्यात राहण्याच्या तारांकित सोयी नाहीत. त्यामुळे त्यांना पुणे येथे राहण्याशिवाय पर्याय नसतो. यात त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे या भागात या चार भागातील कंपन्यांचा विचार केला तर पंचतारांकित हॅाटेल चांगली चालू शकतात. पुण्याच्या सभोवतालचा रिंग रोड अस्तित्वात येईल, तेव्हा याभागातील औद्योगिकीकरण प्रचंड वाढणार आहे. औद्योगिकीकरणाची गरज म्हणून पंचतारांकित हॅाटेल चांगली चालू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com