कुल यांच्याकडून ‘भीमा पाटस’ची माती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुल यांच्याकडून ‘भीमा पाटस’ची माती
कुल यांच्याकडून ‘भीमा पाटस’ची माती

कुल यांच्याकडून ‘भीमा पाटस’ची माती

sakal_logo
By

वरवंड / केडगाव, ता. २६ : ‘‘भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी कारखान्याची माती केली आहे. त्यांना कारखाना चालवता येत नसेल; तर त्यांनी बाजूला व्हावे. कारखाना सुस्थितीत आणल्याशिवाय ही लढाई संपणार नाही,’’ अशी ग्वाही खासदार संजय राऊत यांनी दिली.
भीमा पाटस साखर कारखान्यात ५०० कोटींचे मनीलॅाड्रींग झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर तालुक्यातील कुल विरोधकांनी राऊत यांना दौंडमध्ये सभेचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार राऊत यांनी बुधवारी (ता. २६) वरवंड येथे सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, वैशाली नागवडे, अनिल सोनवणे, समन्वयक शरद सूर्यवंशी, विश्वास भोसले, रामभाऊ टुले, प्रदीप दिवेकर, डॅा. वंदना मोहिते, मीना धायगुडे, योगिनी दिवेकर, सरपंच मीनाक्षी दिवेकर आदी उपस्थित होते. जमावबंदी असताना राऊत यांनी भीमा कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला हार घातला.
यावेळी राऊत म्हणाले, ‘‘राज्याचे वाटोळे कोणी केले असेल, तर भाजपमधील राहुल कुल यांच्या सारख्यांनी केले आहे. सन २०२४ मध्ये आमची सत्ता येणार आहे. तेव्हा सर्व हिशेब चुकते केले जातील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखाना चालवायला ३६ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, त्याचाही हिशेब नाही. ’’
नामदेव ताकवणे म्हणाले, ‘‘राहुल कुल यांना सत्तेची मस्ती आहे. ते म्हणतात, ‘कोण संजय राऊत?’ कुल तुरूंगात जाऊन बसल्यावर मग ते राऊत यांना ओळखतील. कारखाना बंद पडला नाही, तर बंद पाडला आहे. सभासद कुल यांना त्यांची जागा दाखवतील.’’
शिवसेनेचे शरद सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक; तर उत्तम आटोळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल सोनवणे यांनी आभार मानले.

तालुक्यात सत्तेचा गैरवापर : थोरात
रमेश थोरात म्हणाले, ‘‘कारखाना २२ वर्ष कुल यांच्या ताब्यात आहे. ते साखर कारखाना, इंजिनिअरिंग कॅालेज, दूध संघ चालविण्यात अपयशी ठरले आहेत. तालुक्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. पोलिसांकडून अन्याय होत आहे. निराणी यांच्यावर कर्नाटकात गुन्हे दाखल आहेत, त्यांना कारखाना चालवायला दिला आहे.’’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचार करणाऱ्यांची टोळी चालवतात.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भ्रष्टाचाराचे बाप आहेत. ते फक्त भ्रष्टाचारी लोकांच्या प्रचाराला जातात. भाजप फक्त कारखानाच नाही, तर देश, राज्य आणि मुंबई खड्ड्यात घालायला निघाली आहे.
- संजय राऊत, खासदार

वरवंड (ता. दौंड) : जाहीर सभेत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत.