
नारायणबेटात ११११ महादत्तयाग सोहळा
केडगाव, ता. २६ : देऊळगाव गाडा- केडगाव (ता. दौंड) येथील नारायण महाराज बेट येथे ११११ कुंडात्मक महादत्तयाग सोहळा भक्तिमय वातावरणात शुक्रवारी (ता. २६) पार पडला. भारतात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात यज्ञकुंड झाल्याने त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
सद्गुरू नारायण महाराज यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले होते. नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्ट केडगाव व सद्गुरू श्री शंकरशेठ महाराज मठ केडगाव (जि. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन केले होते. शंकरशेठ मठाचे मठाधिपती अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
नारायण महाराज यांनी सन १९३३ मध्ये येथे ११०८ सत्यनारायण पूजा घातल्या होत्या. आज ११११ यज्ञकुंड झाले. होमहवन व मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून गेला होता. यज्ञकुंडानिमित्त भव्य शामियाना उभारला होता. व्यासपीठावर देवींची साडेतीन शक्तीपीठे, महादेव, नवनाथ, अष्टविनायक, खंडोबा, दत्तात्रेय, नारायणमहाराज, शंकरमहाराज, स्वामी समर्थ अशा शक्तीपिठांच्या मुर्ती ठेऊन त्यांना आवाहन केले होते. नवग्रहांचे पूजन यावेळी केले.
यज्ञानंतर नारायण महाराज यांचा १३८वा जन्मोत्सव साजरा केला. त्यानिमित्त मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाआरती व छबिना काढण्यात आला. या सोहळ्यानिमित्त सकाळपासून महाप्रसाद चालू होता. बुधवारी १०८ सत्यदत्त पूजा; तर गुरुवारी १०८ सत्यनारायण पूजा केल्या.
या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मध्यप्रदेश येथून भाविक आले होते.
सोन्याची मूर्ती १२ वर्षांनंतर बाहेर
नारायण महाराज यांना सन १९२८मध्ये कोलकत्ता येथील दासानी नावाच्या भक्ताने दत्तात्रेयांची सोन्याची भरीव मुर्ती पूजेसाठी भेट दिली आहे. सध्या ही मुर्ती महाराष्ट्र बँकेच्या लॅाकरमध्ये असते. या सोहळ्यानिमित्त ही मुर्ती पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी १२ वर्षानंतर दर्शनासाठी आणण्यात आली होती.
००७७४
देऊळगाव गाडा- केडगाव (ता. दौंड) : सद्गुरू नारायण महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेले ११११ यज्ञ.