
कृषिमंत्र्यांच्या हस्ते गायकवाड यांचा गौरव
निमगाव केतकी, ता. २१ : सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांच्या सहा जणांच्या गटाला केंद्र शासनाचा वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या गटात इंदापूर तालुक्यातील कळस गावचे सुपुत्र डॉ. नीलेश निवृत्ती गायकवाड यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथे शनिवारी (ता. १६) झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी या राष्ट्रीय पुरस्काराचा स्वीकार केला.एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह व प्रमाणपञ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सहा शास्त्रज्ञांच्या गटात डॉ. मराठे यांच्यासह डॉ. ज्योत्सना शर्मा, डॉ. दिनेश बाबू, डॉ. नृपेंद्र सिंग, डॉ. नीलेश गायकवाड व डॉ. आशिष मायती यांचा समावेश आहे.
पुरस्काराबाबत डॉ. गायकवाड म्हणाले, की कोरडवाहू क्षेत्रामध्ये डाळिंब संशोधनामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आमच्या गटाने डाळिंबाच्या प्रतिकूल हवामानात अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. डाळिंब प्रक्रिया व मूल्यवर्धन संशोधनातून डाळिंबाच्या विविध भागाच्या व्यावसायिक उपयोगीतेसाठीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा हजारो डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.
01241
Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00832 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..