निमगाव येथे अस्तरीकरणाविरोधात ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमगाव येथे अस्तरीकरणाविरोधात ठराव
निमगाव येथे अस्तरीकरणाविरोधात ठराव

निमगाव येथे अस्तरीकरणाविरोधात ठराव

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.८ : सध्या सुरू असलेल्या नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध असून यासाठी निमगाव कितकी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत अस्तरीकरणाच्या कामाला ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन कडाडून विरोध दर्शविला आहे.
संत सावतामाळी मंदिराच्या आवारात गुरुवारी (ता.६) सरपंच प्रवीण दशरथ डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यात निमगाव केतकी हद्दीतून जाणाऱ्या नीरा डावा कालव्याचे जलसंपदा विभागाकडून करण्यात येणाऱ्या अस्तरीकरणाला विरोध करण्याचा ठराव सर्वांमध्ये पास करण्यात आला घेण्यात आला.

निमगावच्या हद्दीतून नीरा डावा कालवा जात असून, सदर कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम मंजूर झाल्याचे समजल्यावर गावातील ग्रामस्थांनी मंजूर झालेल्या कामावर ग्रामसभेची निवेदनाद्वारे मागणी केली. त्यानुसार ग्रामसभेत चर्चा झाली. कालव्याचे अस्तरीकरण झाले तर पाणी झिरपने बंद होईल, त्यामुळे शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळणार नाही.
या कारणामुळे ग्रामस्थांनी अस्तरीकरणाला पूर्णपणे विरोध दर्शविला.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, सुवर्णयुग पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे, सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे,कांतिलाल भोंग, माणिक भोंग,ॲड. सुभाष भोंग, ॲड.महेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय केकाण, दादाराम जाधव, बाळू भोसले, उत्तम भोंग, विशाल जगताप आदी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

ग्रामस्थांना गाव सोडून जाण्याची वेळ
नीरा डावा कालव्यामुळे सदरचा निमगाव केतकी व इतर परिसरात बागायती क्षेत्र आहे. जर कालव्याचे अस्तरीकरण झाले तर पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई भासणार असून पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागेल. ग्रामस्थांना गाव सोडून जाण्याची वेळ येईल. त्यामुळे सदर अस्तरीकरणाला पूर्णपणे विरोध करून ठराव घेऊन तो ठराव संबंधित विभागास व लोकप्रतिनिधींना पाठवण्यात येणार आहे.

पाणी आडवा पाणी जिरवा योजनेस बाधा
नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून अस्तरीकरण झाल्यास गावाच्या भोवतालच्या विहिरीत, तलाव, बोअरवेल व इतर सर्व पाण्याचे स्रोत बंद होतील. त्यावर अवलंबून असणारे पशू पक्षी व प्राणी यांचे जीवन पूर्णपणे विस्कळित होईल पाणी पातळी कमी होईल व शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेचा योजनेत देखील बाधा येईल. त्यामुळे शासनाने सदर कालवा दुरुस्त करावा व कालव्याच्या अस्तरीकरण न करता ते रद्द करावे असे ग्रामसभेत सर्वानुमते ठरले.