
निमगाव केतकी वीज उपकेंद्राची क्षमता वाढणार
निमगाव केतकी, ता. २४ : निमगाव केतकी वीज उपकेंद्रासाठी अतिरिक्त पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिवांना (ऊर्जा) सदर मागणी तपासून तत्काळ उचित कार्यवाही करण्याची सूचना केल्याची माहिती इंदापूर तालुका शिवसेनेचे प्रमुख महारुद्र पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ‘‘निमगाव केतकी केंद्रात ओव्हरलोडमुळे शेतीचे वीजपंप चालत नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. या उपकेंद्रात अतिरिक्त पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बसवावा व झगडेवाडी येथील मंजूर वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते देविदास भोंग व बबन खराडे यांनी केली होती. त्यांची ही मागणी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांच्याकडे सादर केली. शिवतारे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ऊर्जा सचिवांना सदर मागणी तपासून तत्काळ उचित कार्यवाही कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे येथील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा रखडलेला वीज प्रश्न मार्गी लागेल.’’
याबाबत निमगाव येथील सहाय्यक अभियंता विशाल गावडे म्हणाले, ‘‘सध्या निमगाव केतकी उपकेंद्रात १० एमव्हीए व पाच एमव्हीए असे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. येथे विजेची मोठी मागणी वाढत असल्याने सतत ओव्हरलोड येऊन शेती पंप चालण्यास अडचण येते. नवीन मंजूर झालेले झगडेवाडीचे उपकेंद्र सुरू होऊन निमगाव केतकी उपकेंद्रात आणखी एक पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर येथील सहा शेती पंपाच्या फिडरचा वीजपुरवठा सुरळीत होईल.’’