शेतकऱ्यांनी जगायचं कसं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता. २२ ः सध्या कांद्याला दर नसल्याने कांदा वखारीत सडत आहे. तर दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणी सापडला आहे. एका गाईला दररोज पेंड व चारा याचा खर्च पाचशे रुपये होत असून दुधाचे चारशे रुपये मिळत आहेत. एका गायी पाठीमागे शंभर रुपये पदरमोड करून हा व्यवसाय करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा संतप्त सवाल दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. सरकारने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ही त्यांच्यामधून होत आहे.
इंदापूर तालुक्यातील जाधववाडी येथील दूध उत्पादक शेतकरी विकास जाधव म्हणाले, ‘‘लिटरला ३८ रुपये दर मिळत होता. त्यावेळी चार पैसे शिल्लक राहत होते. परंतु, सध्या दर ३४ रुपयांवर आला आहे. प्रत्यक्षात मात्र ३१ किंवा ३२ रुपये दर मिळत आहे. ५० किलो पेंडीचे पोते १,६५० रुपये तर ४५ किलो भुशाचे पोते तेराशे रुपये एवढे महाग मिळत आहे. एका गाईला दररोज सहा किलो पेंड व भुसा दोन किलो व वैरण याचा खर्च पाचशे रुपये होतो.
माझ्याकडे सहा गाई असून दिवसाला ७० लिटर दूध जाते. सरासरी एक गाय १३ ते १४ लिटर दूध देते. ७० लिटरचे ३२ रुपयांनी २ हजार २४० रुपये होतात. तर पेंड व चारा याचा खर्च तीन हजार रुपये होत आहे. दवाखाना व आम्ही दोघे भाऊ व आमच्या बायका असे चौघे जण दिवसभर राबतोय. रोजचा पाचशे ते सातशे रुपये तोटा आम्ही कुठून भरून काढणार आहोत. शासनाने दूध दरात लक्ष न घातल्यास आमचा हा व्यवसाय कधीही बंद पडू शकतो.
शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीकांत करे म्हणाले, ‘‘दुधाला ३८ रुपये दर मिळत होता. त्यावेळी शेतकऱ्यांना थोडं परवडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांनी बँकेकडून कर्ज काढून दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. आता दर पडल्यानंतर तो कशाने हे कर्ज फेडणार आहे. वास्तविक उन्हाळ्यात दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे दर वाढणे साहजिक असताना सध्या दर जाणीवपूर्वक पाडले गेले आहेत. यामध्ये सरकार व राज्यातील दूध संघ यांची मिलीभगत आहे. दोघे मिळून दूध उत्पादक शेतकऱ्यांना लुटत आहेत. दुधाचे दर कमी झालेले असताना विक्री मात्र पूर्वीच्या दराने चालू आहे. पशुखाद्याच्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे व सध्या दुधाला कमीत कमी ४० रुपये दर दिला पाहिजे अन्यथा शेतकरी संघटना या विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे.’’