
आर्थिक मदतीचे आवाहन
निमगाव केतकी, ता. २५ ः निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पक्षीमित्र धनंजय राऊत यांचा मुलगा माधव व वडील सदाशिव राऊत हे दोघे अपघातात जखमी झाले आहेत. यामध्ये मुलगा माधव हा गंभीर जखमी आहे. बुधवारी (ता. २४) त्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया तातडीने केली आहे. राऊत यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची सध्या मोठी गरज निर्माण झाली आहे. समाजातील दानशूर लोकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
धनंजय राऊत यांचा दहावी झालेला मुलगा माधव व वडील सदाशिव हे दोघे काल बुधवारी दुचाकीवर वालचंदनगर येथे दवाखान्यात जात असताना वालचंदनगर हद्दीतच अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुलगा माधव याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्याला बारामती येथे गिरीराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले व वडील सदाशिव यांना वालचंदनगर येथेच खासगी दवाखान्यात दाखल केले.
धनंजय हे ड्रायव्हर असून ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांची पत्नी शेतमजुरी करते. त्यांना तीन मुली व मुलगा आहे. नुकतेच एका मुलीचे लग्न झाले आहे. दवाखान्याचा खर्च दीड लाखांपर्यंत असल्याने त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन दानशूर व्यक्ती व संस्थांना केले आहे. आर्थिक मदत रोख स्वरूपात अथवा खालील फोन पे क्रमांक - ८७६७२५२८२५ (गौरी धनंजय राऊत) यावर करावी.