
शिंदेवाडीत पकडले साडेतीन टन गोमांस
खेड शिवापूर, ता. २४ : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे शुक्रवारी (ता. २४) सकाळी बेकायदेशीरपणे गोमांस वाहतूक करणाऱ्या दोन पीक अप राजगड पोलिसांनी ताब्यात घेतल्या. ही दोन वाहने आणि त्यातील सुमारे साडेतीन टन गाय आणि बैलाचे मांस पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणातील गाय, बैल कापणारे, मांस विकत घेणारे आणि पीक अपचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, याप्रकरणी मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी फिर्याद दिली. पुणे-सातारा रस्त्याने शुक्रवारी पहाटे दोन पीक अप वाहनांतून पुण्याकडे गोमांस नेण्यात येणार आहे, अशी माहिती स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार स्वामी आणि त्यांचे सहकारी शुक्रवारी पहाटे पाच वाजता खेड शिवापूर टोल नाक्यावर थांबले. थोड्या वेळाने दोन संशयित पीक अप वाहने टोल नाक्यावर आली. यावेळी राजगड पोलिसांची मदत घेऊन त्यांनी शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज घाट रस्त्यावर ही वाहने अडवली. यावेळी त्या दोन्ही वाहनात कापलेल्या गाय-बैलांचे धड, मुंडके आणि मांस आढळून आले. सदर मांस हे इंदापूर येथे भरले असून, ते पुण्यातील कोंढवा येथे विक्रीसाठी नेण्यात येत होते. याबाबतचा कोणताही परवाना संबंधितांकडे आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी या दोन वाहनांसह त्यातील सुमारे साडेतीन टन गाय-बैलाचे मांस ताब्यात घेतले. या मांसाचे नमुने रासायनिक तपासणी विश्लेषणकामी पाठविण्यात आले आहेत.
याप्रकरणी राजगड पोलिसांनी गाय व बैल कापणारे, मांस विकत घेणारे आणि पीक अपचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Khd22b01051 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..