रावसाहेबांशी साधा ‘सोईस्कर’ संपर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावसाहेबांशी साधा ‘सोईस्कर’ संपर्क
रावसाहेबांशी साधा ‘सोईस्कर’ संपर्क

रावसाहेबांशी साधा ‘सोईस्कर’ संपर्क

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. ९ : नागरिकांना न भेटणे, फोन न उचलणे या कात्रज मंडल अधिकारी कार्यालयातील रावसाहेबांच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे विविध कामे होण्यास सुमारे तीन-तीन महिन्यांच्या कालावधी लागत आहे. मात्र, मध्यस्थांच्या मार्फत ‘सोईस्कर’ संपर्क साधल्यास कामे मार्गी लागत आहेत. रावसाहेबांच्या या कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहेत.


कात्रज मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत खेड-शिवापूर तलाठी सजातील अनेक गावे येतात. त्यामुळे सातबारा संबंधीच्या वेगवेगळ्या कामांसाठी नागरिकांना कात्रज येथील मंडल अधिकारी कार्यालयात जावे लागते. मात्र येथील कार्यालयात अनेकदा रावसाहेब अनुपस्थित असतात. रावसाहेब नागरिकांना भेटत नाहीत, फोन उचलत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याचा अनुभव नाव न छापण्याच्या अटीवर नागरिकांनी सांगितला.

अखेर वैतागून नागरीकांना तलाठी सजातील काही जणांच्या माध्यमातून रावसाहेबांशी ‘सोईस्कर’ संपर्क साधावा लागतो. त्यानंतर मग संबंधितांचे काम केले जाते. तोपर्यंत हे काम होण्यासाठी सुमारे दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटलेला असतो.

रावसाहेबांच्या या कारभाराच्या तक्रारी केल्या, तर आपले काम केले जाणार नाही, या भीतीने कोणी उघडपणे वरिष्ठांकडे रावसाहेबांची तक्रार करत नाहीत. अशा या कारभाराची दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------------------
रावसाहेबांच्या गैरकारभाराची सविस्तर माहिती घेण्यात येईल, शहानिशा करून संबंधित मंडल अधिकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात येईल. -संजय आसवले, प्रांताधिकारी, हवेली