
फास्टॅगच्या गोंधळामुळे पीएमपी प्रवाशांना मनस्ताप
खेड-शिवापूर, ता. २१ : पीएमपी प्रशासन आणि खेड-शिवापूर टोल प्रशासन यांच्यातील फास्टॅग गोंधळामुळे बुधवारी पीएमपीच्या सुमारे अकरा बस खेड-शिवापूर टोल नाक्यावर सुमारे दोन तास थांबून राहिल्या. यामुळे बुधवारी (ता. २१) प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर दोन तासांनी फास्टॅगची वजा रक्कम रिचार्ज केल्यानंतर या बस सोडण्यात आल्या.
फास्टॅग गोंधळामुळे कात्रज ते विंझर, सासवड आणि सारोळा या मार्गावरील पीएमपी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पीएमपी प्रशासन आणि खेड-शिवापूर टोल प्रशासन यांच्यातील फास्टॅग गोंधळामुळे या बस थांबविण्यात आल्याचे समजले. सुमारे दोन तासांनी पीएमपी प्रशासनाने फास्टॅगमधील वजा रक्कम रिचार्ज केल्याने या मार्गावरील बस पुन्हा सुरू झाल्या. मात्र, या गोंधळात या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय झाली.
याबाबत पीएमपीचे वाहतूक निरीक्षक हरिदास कोंडे म्हणाले, "या मार्गावरील बसच्या फास्टॅगची रक्कम आम्ही आगाऊ भरली आहे. मात्र टोल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या बस टोल नाक्यावर थांबविण्यात आल्या."
पुणे - सातारा महामार्गावरील पीएमपी बसच्या मासिक फास्टॅगची रक्कम आमच्याकडे जमा आहे. मात्र, बसच्या फास्टॅगमध्ये बँकेचा कमीत कमी बॅलन्स पीएमपी प्रशासनाने ठेवला नाही. त्यामुळे या बसेसचे फास्टॅग कार्यरत झाले नाही. त्यांच्या चुकीमुळे पीएमपी बसेस दोन तास टोल नाक्यावर थांबून राहिल्या.
- अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड
00960