
वेळूतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक
खेड शिवापूर, ता. २३ : वेळू (ता. भोर) येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
प्रणीत दयानंद गोसावी (वय २४, रा. चाकण, ता. खेड), शुभम भाऊलाल नागपुरे (वय २२), शुभम युवराज सरवदे (वय १९), आकाश मोडक नागपुरे (वय २२), कार्तिक मूलचंद गौपाले (वय २९, चौघेही रा. नाणेकरवाडी-चाकण), अशी याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने माहिती दिली की, काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी वेळू येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तर, राजगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. हा तपास करताना या प्रकरणात वापरलेले वाहन पुण्याकडे जाताना आढळून आले. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि वाहनाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. या तपासात प्रणीत गोसावी याने इतर चार जणांच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून गोसावी याला चाकण परिसरातून चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता इतर चार साथीदारांसह एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार या प्रकरणातील सर्व आरोपींना राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले.