गोगलवाडी रस्त्याचे अपूर्ण काम होणार पूर्ण

गोगलवाडी रस्त्याचे अपूर्ण काम होणार पूर्ण

खेड शिवापूर, ता. ८ : येथील गोगलवाडी रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी गोगलवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी ठेकेदाराला हे अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याची सूचना केली अन्‌ ठेकेदारानेही २० मेपासून या अपूर्ण रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
सुमारे दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत गोगलवाडी फाटा ते चतुर्मुख महादेव मंदिर या दरम्यानच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना त्यातील सुमारे सातशे मीटर रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. या अपूर्ण राहिलेल्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. गोगलवाडी फाट्याजवळील ओढ्यावरील रस्ता तर अत्यंत धोकादायक झाला आहे. त्याठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे. या अपूर्ण कामासाठी ग्रामपंचायत सदस्य गेल्या दीड वर्षांपासून ठेकेदार तसेच मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती.

अखेर सोमवारी सकाळी गोगलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी गोगावले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेचे अधीक्षक अभियंता वि. द. पालवे यांना निवेदन दिले. यावेळी पंधरा दिवसात या अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करा. अन्यथा तुमच्या कार्यालयापुढे भजन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला.
यावेळी ग्रामस्थ, ठेकेदार आणि मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सडक योजनेचे अधीक्षक अभियंता पालवे यांनी गोगलवाडी रस्त्याचे अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याची सूचना ठेकेदाराला केली. त्यांनतर ठेकेदाराने २० मे पासून या अपूर्ण रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com