
फसवणूकप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
खेड-शिवापूर, ता. २८ : व्याजापोटी दिलेले सगळे पैसे मिळविण्यासाठी वेळोवेळी जातिवाचक शिवीगाळ-दमदाटी करून पैसे उकळल्याप्रकरणी तसेच फसवून फिर्यादीच्या नावावरील फ्लॅटवर कर्ज काढल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सुशील ज्ञानेश्वर रोकडे आणि गणेश ज्ञानेश्वर रोकडे (रा. शिवापूर, ता.हवेली, पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मंगेश उत्तम घोलप यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. घोलप यांनी रोकडे याच्याकडून साडे तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. ते परत घेण्यासाठी रोकडे याने वेळोवेळी घोलप यास पिस्टलने मारण्याची धमकी देऊन, जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी करून या पैशाच्या व्याजापोटी आजपर्यंत १८ लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीचे दोन फ्लॅट फिर्यादीला फसवून बँकेत तारण म्हणून ठेवून त्यावर २३ लाख रुपयांचे कर्ज काढले आहे, असे घोलप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुशील रोकडे आणि गणेश रोकडे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.