चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लावणी

चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लावणी

Published on

कोळवण, ता. २० : चिखलगाव (ता. मुळशी) येथे नऊ एकर क्षेत्रावर मुळशी तालुका कृषी विभागाकडून मागील दोन वर्षांपासून यांत्रिकीकरणाद्वारे भाताची लागवडीचा प्रयोग राबविला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भात लागवडीसाठी मजुरांवर होणारा खर्च २० हजार रुपयांनी वाचून उत्पन्न वाढणार आहे.
तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार, उपकृषी अधिकारी हरिभाऊ कुलकर्णी, सहायक कृषी अधिकारी शेखर विरणक, सहायक कृषी अधिकारी नवनाथ शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. लहू फाले यांनी १२ जून या दिवशी बीज प्रक्रिया करून रोपवाटिका तयार केली. यांत्रिकीकरणाद्वारे बुधवार (ता. १६) भात लागवड करण्यात आली. हा प्रयोग पाहण्यासाठी शेजारील गावातील शेतकरी पांडुरंग धिडे, दीपक खिलारी, मारुती साठे, अंकुश फाले, कृष्णा फाले, भरत फाले, अतुल फाले, संग्राम फाले आदी उपस्थित होते.

हेक्टरी उत्पादनात होते वाढ
पारंपारिक भात लागवडीचे उत्पादन हे हेक्टरी ३० टन मिळते, तर मशिन‌द्वारे भात लागवड केल्यास हेक्टरी उत्पादन हे ४५ टनांपर्यंत मिळते. म्हणजेच उत्पादनात हेक्टरी १५ टनांची वाढ होते. शिवाय मजुरांची टंचाई असतेच त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होते. बीज प्रक्रियेमुळे हेक्टरी दहा टक्के उत्पादन वाढते. शिवाय भात रोपांना फुटवे भरपूर येतात व रोपांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. परिणामी भात पिकावर रोग येत नसून औषध फवारणीवरील खर्च वाचतो.

यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड प्रयोग सलग तिसऱ्या वर्षी करत आहे. यावर्षी मी नऊ एकर क्षेत्रावर मशिनद्वारे भात लागवड करत आहे. यामुळे रोपांची योग्य अंतरावर लागवड होते. दोन ओळीत योग्य अंतर असल्याने हवा खेळती राहते. भरपूर सूर्यप्रकाश रोपांच्या मुळांना मिळतो. शिवाय आंतरमशागत सोपी होते व खतासाठी युरिया ब्रिकेटचा वापर करता येतो.
- लहू फाले, प्रगतशील शेतकरी, चिखलगाव.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणामधून भात लागवड करावी. यामुळे वेळ, मजुरीवरील खर्च वाचून उत्पादन वाढते.
शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरुन ‘महाडीबीटी फार्मर लॉगइन’ वरून राज्य कृषी यांत्रिकीकरणातून ऑनलाइन अर्ज करावेत. यासाठी शासनाकडून ५० टक्के सबसिडी दिली जाते. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी ३१ जुलै अगोदर पीकविमा काढून घ्यावेत, असेही आवाहन करतो.
- हनुमंत खाडे, तालुका कृषी अधिकारी, मुळशी.

Marathi News Esakal
www.esakal.com