‘एक दिवस-एक तालुका’ उपक्रम करणार : पालकमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एक दिवस-एक तालुका’
उपक्रम करणार : पालकमंत्री
‘एक दिवस-एक तालुका’ उपक्रम करणार : पालकमंत्री

‘एक दिवस-एक तालुका’ उपक्रम करणार : पालकमंत्री

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ९ : ‘‘पालकमंत्री यापुढे फक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांपुरते मर्यादित राहणार नसून, ते प्रत्येक गावागावांतील विकास योजनांचे प्रेरक आणि कार्यवाहक राहतील, हाच संकेत आपण पुणे जिल्ह्याच्या गावागावांत देणार आहोत. यासाठी ‘एक दिवस एक तालुका आणि १३ तालुक्यांसाठी १३ आठवडे,’ असा उपक्रम आपण सुरू करत आहे,’’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंदूर (ता. शिरूर) येथे जाहीर केले.
ते म्हणाले, ‘‘एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री फक्त कधी तरी एखाद्या गावात येणे आणि त्यांचे सर्व कार्यक्रम शहरांमध्ये होऊन फक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांपुरते त्यांचे अस्तीत्व दिसणे, असे यापुढे होणार नाही. मी स्वत: पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्याचे स्वतंत्र नियोजन केले आहे. यात प्रत्येक आठवड्यात एक तालुकाभेट, असे जिल्ह्यातील १३ तालुक्यांसाठी मी दौरा कार्यक्रम आखला आहे. ज्या तालुक्यात जाणार आहे, त्या तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच-उपसरपंच यांची एकत्रित भेट घेवून प्रत्येक गावातील कुठली विकास कामे रखडलेली आहेत, त्यांची कारणे काय आहेत, नवीन कुठल्या कामांची गरज गावाला आहे, पाणी, वीज, शेती वा तत्सम लोकहिताच्या कुठल्या कामांबाबत अडचणी आहेत, यांची समोरासमोर चर्चा करुन त्यावर तत्काळ कार्यवाही व उपाययोजना आपण करणार आहोत.’’

भाजपमध्ये प्रवेशास नकार
पाबळ-केंदूर गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सविता एकनाथ बगाटे यांना चंद्रकांत पाटील यांनी पाबळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, ‘दादा, तसे काहीही निमंत्रण देवू नका, मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार आहे,’ असे सांगत बगाटे यांनी भाजपाचे आवतान तत्काळ टोलविले.