‘कात्रज’च्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कात्रज’च्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन
‘कात्रज’च्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन

‘कात्रज’च्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २४ : पुणे जिल्हा सहकारी दूध उप्तादक संस्थेतील दूध फॅट फेरफार प्रकरणात पाच अधिकाऱ्यांचे निलंबन केले असून, या प्रकरणात मदत केल्याच्या कारणाने अन्य चार जणांची उचलबांगडी केल्याची माहिती अध्यक्षा केशरताई सदाशिव पवार व कार्यकारी अधिकारी संजय कालेकर यांनी दिली.

कात्रज (पुणे) दुग्धालयात ९ नोव्हेंबर रोजी आलेल्या एका दूध टॅंकरमधील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेताना एका कंत्राटी सेवकाबद्दल संशय आला. त्यामुळे या टॅंकरमधील दुधाची फेरतपासणी केली होती व सदर सेवकाला तत्काळ कामावरून कमी केले होते. मात्र, या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून कात्रज प्लॅंट दूध संकलन प्रमुखासह पाईट (ता. खेड) प्लॅंट प्रमुख, काही केमिस्ट व अधिकारी-कर्मचारी, अशा एकूण नऊ जणांची चौकशी सुरू करून प्रत्येकाकडून खुलासेही मागविले होते.
याबाबतचा चौकशी अहवाल बुधवारी (ता. २३) संचालक मंडळ बैठकीत ठेवण्यात आला. बैठकीतील निर्णयानुसार प्रथमदर्शनी दोषी असलेल्या कात्रज प्लॅंट दूध संकलन प्रमुख, पाईट प्लॅंट प्रमुख, पाईट येथील एक केमिस्ट, कात्रज येथील दोन केमिस्ट, अशा एकूण पाच जणांचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्यांच्या जागी नवीन अधिकारी-कर्मचारी नियुक्त केली.
दरम्यान, कात्रज संघ हा राष्ट्रवादीची सत्ता असल्याने संस्था कारभाराची पूर्ण माहिती वरिष्ठ नेत्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यापर्यंत असावी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनाही कळविले असून, ते स्वत: कात्रजच्या सर्व संचालकांसोबतही बोलल्याचे केशरताई पवार यांनी सांगितले.

कात्रजच्या कारभाराबद्दल एकाच वेळी नऊ जणांवर कारवाई करताना मी कचरलेले नाही अन् भविष्यात असे प्रकार मी सहन करणार नाही. चालू असलेल्या चौकशीनंतर कुणीही दोषी आढळल्यास कडक कारवाईही आपण करणार आहे.
- केशरताई पवार, अध्यक्षा,
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ, कात्रज

कारवाई केलेले अधिकारी-केमिस्ट
कात्रज मुख्यालयातील केमिस्ट विकास भुजंगे, प्रमोद काळे व दूध संकलन विभाग प्रमुख संदीप खाडे, पाईट येथील संकलन केंद्रातील शांताराम सावंत व केमिस्ट ज्ञानेश्वर डोंगरे आदींचे निलंबन केल्याची माहिती कात्रज प्रशासन विभागाने दिली.