
आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर नेमली चौकशी समिती
शिक्रापूर, ता. २६ ः ज्या कारणाने वाबळेवाडी (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळेवर व दत्तात्रेय वारे यांच्यावर पुणे जिल्हा परिषदेने तत्काळ कारवाई केली. त्याच कारणांनी शिरूर तालुक्यातील २४ गावांतील जिल्हा परिषद शाळा कारवाईसाठी पात्र असल्याचे शिरूर पंचायत समितीने दिलेल्या माहितीनुसार उघड झाले आहे. मात्र, सदर २४ मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई होत नाही म्हणून दिलेल्या सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर चौकशी समिती नेमण्याचा निर्णय शिरूर पंचायत समितीने घेतल्याने आत्मदहनाचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वाबळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सतीश वाबळे यांनी दिली.
दरम्यान, कारवाईचा निर्णय लवकर न घेतल्यास शिरूर पंचायत समितीपुढे सामुहिक आत्मदहन करण्याचा पुन्हा एकदा निर्धार सतीश वाबळे, खंडू वाबळे, सत्यवान कोठावळे व प्रकाश वाबळे यांनी व्यक्त केला. शालेय कामकाजात हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा व सेवा वर्तणूक कायदा भंगाचे कारण सांगत दोन वर्षांपूर्वी वाबळेवाडीचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांचे पुणे जिल्हा परिषदेने निलंबन केले होते. पुढील काळात त्यांच्या चौकशीत फार काही ठोस हाताला लागले नसले तरी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत वाबळेवाडी ग्रामस्थांनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची मागील सात वर्षांची माहिती मागविली. माहिती अधिकारातील या माहितीत तालुक्यातील २४ शाळांनी कुठलाही हिशोब, सीएसआर निधीतील बांधकामांची माहिती, देणग्या यांची माहिती संकलित न केल्याचे निदर्शनास येताच वाबळेवाडी ग्रामस्थांनी या २४ शाळांवर तत्काळ कारवाईची मागणी केली. यावर पुणे जिल्हा परिषदेकडून काहीच प्रतिसाद दिला गेला नसल्याने अखेर मागील महिन्यात २५ मार्च रोजी सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानुसार या सर्वांना शिक्रापूर पोलिसांनी बोलाविले असता त्यांनी वरीलप्रमाणे इशारा देत आपला निर्णय कळविला.
वाबळेवाडी शाळेच्या चौकशीसाठी १६ जुलै २०२१ रोजी वारे यांना शिरूर पंचायत समितीत बोलावून एक तासाची चौकशी केली व कारवाई करण्यात यावी असा अहवाल त्याच दिवशी जिल्हा परिषदेला पाठविला. विशेष म्हणजे शिरूर पंचायत समितीकडे वाबळेवाडी शाळेसंदर्भात कुठलाच तक्रार अर्ज १६ जुलैच्या आधी नसल्याचे शिरूर पंचायत समितीने आपल्या खुलाशात वाबळेवाडी ग्रामस्थांना कळविले आहे. अशा विचित्र कारभारामुळे ग्रामस्थ मात्र २४ शाळांच्या कारवाईसाठी आता आग्रही झाल्याचे आंदोलक सतीश वाबळे यांनी सांगितले.
शाळांकडे माहितीच उपलब्ध नाही
कोयाळी-पुनर्वसन, शिक्रापूर, वडगाव-रासाई, पिंपळे-धुमाळ, जातेगाव बुद्रुक, रांजणगाव गणपती, कोंढापुरी, वढू बुद्रुक, कोरेगाव-भीमा, तळेगाव-ढमढेरे, टाकळी-भीमा, कारेगाव, न्हावरा, कर्डे, निमोणे, मांडवगण फराटा, मलठण, इनामगाव, उरळगाव, पाबळ, केंदूर, टाकळी-हाजी, वाघाळे, सरदवाडी आदी २४ शाळांमध्ये सन २०१४ ते २०२१पर्यंत झालेली सर्व विकास कामे, साहित्य खरेदी पूर्वमान्यता, कार्योत्तर मंजुरी, प्रशासकीय मान्यता प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता, लेखासंहितानुसार नोंद, मोजमाप तपासणी अहवाल, तपासणी अधिकारी, वस्तु सेवाकर, शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेली बक्षीसे, बांधकाम पूर्णत्व दाखले, सीएसआर कंपनी करार आदींची माहिती मागविली असता वरील २४ शाळांकडे ती उपलब्धच नसल्याचे वास्तव शिरूर पंचायत समितीने माहिती अधिकारात कळविले आहे. पर्यायाने वाबळेवाडीच्या धर्तीवर वरील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, सहशिक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांवर वारेंसारखीच निलंबनाची कारवाई होत नाही म्हणून वाबळेवाडीकरांनी आता सामुहिक आत्महत्येचे हत्यार उपसले आहे.
शिक्रापूर पोलिसांकडे पंचायत समितीचा खुलासा.!
२५ मार्चच्या सामूहिक आत्महत्येच्या इशाऱ्याने काल (ता. २५) रोजी शिरूर पंचायत समितीने एका पत्राद्वारे शिक्रापूर पोलिसांना कळविले की, सदर चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रानुसार आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.