
आदिवासी कुटुंबांची ससेहोलपट थांबेना
शिक्रापूर, ता.२८ : शेकडो वर्षे केंदूर (ता.शिरूर) येथील ठाकरवाडीतील १०३ कुटुंबे डोंगरवस्तीवर राहत आहेत. मात्र, २००७ मध्ये एसईझेडसाठी संपादित झालेल्या क्षेत्रात शासनाने आदिवासींची १३० घरे व तेथील जमीनही संपादित केल्याने ही सर्व कुटुंबे गेली १६ वर्षे उघड्यावर पडली आहेत. सध्या गायरान जमिनीवर ती राहत आहेत. त्याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद आहे. मात्र, शासनाने त्यांना ना नवीन घरे दिली ना त्यांच्याकडे आजपर्यंत प्रशासनाने घर नसल्याचे त्यांची ससेहोलपट थांबत नाही.
पर्यायाने ही सर्व कुटुंबे आता आंदोलनच्या पवित्र्यात असून पहिली दाद त्यांनी नुकतीच पुणे एमआयडीसी कार्यालयात मागितली असून शेवटची दाद आदीवासींच्याच जातकुळीतील राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडे मागण्याची तयारी सर्व आदिवासींनी केली आहे.
खेड विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) २००६ मध्ये जाहीर झाल्यावर केंदूर येथील सुमारे २५०० एकर क्षेत्र संपादित केले. यात एकट्या केंदूर गावचे ४५० एकर गायरान शासनाने ताब्यात घेतले पण केंदूरसाठी एक ग्रामपंचायत इमारत व शाळेची इमारत या शिवाय काहीही दिले नाही. अर्थात ही ससेहोलपट येथेच थांबली नाही तर गावात असलेल्या ठाकरवाडीतील १०३ कुटुंबांची घरे, वापरात असलेली गायरान जमीनही संपादित केली. पर्यायाने सर्व आदिवासी ठाकर बेघर झाले आहेत. त्यांना घरांसाठी जागाही दिली जात नाही. विशेष म्हणजे या सर्व कुटुंबांच्या घरांसाठी बाळा ठाकर म्हणून एका आदिवासीने आपली २४ गुंठे जागा घरकुलासाठी शासनाकडे बक्षीसपत्र करून दिली होती तीही जागा शासनाने एमआयडीसीच्या घशात घातल्याने या सर्व १०३ आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, असे केंदूरचे उपसरपंच विठ्ठल ताथवडे यांनी सांगितले.
अनुषंगाने त्यांनी आज पुणे एमआयडीसी कार्यालयात आपली लेखी दाद मागितली असून एमआयडीसीचे संजीव देशमुख यांची भेट न झाल्याने त्यांचे वतीने कार्यक्षेत्र अधिकारी मंजुश्री शेवाळे यांनी आदिवासींचे निवेदन स्वीकारले.
यावेळी सरपंच सूर्यकांत थिटे, उपसरपंच विठ्ठल ताथवडे, ठाकरसखा गणेश थिटे, उद्योगपती सतीश थिटे, शाहूराज थिटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे, संपत गावडे, लक्ष्मण गावडे, शिवाजी गावडे आदी उपस्थित होते.
माळीण झालेय तरीही कुणी ढुंकून बघेना..!
दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा प्रकार ठाकरवाडीत नित्याचा झाले आहे. मागील वर्षी दोन वर्षाचा बालकाचा मृत्यू दरड कोसळून झालाय. त्याची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही. आता घराचाच प्रश्न गंभीर झाला आहे. ठाकरवाडीचे माळीण झालेय तरीही कुणी ढुंकून बघेना, असे
आदिवासी ग्रामपंचायत सदस्या ज्योती गणेश गावडे व मंगेश भालेकर यांनी सांगितले.
केंदूर येथील १०३ आदिवासी कुटुंबाचा प्रश्नासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन पुढील आठवड्यात आदिवासी प्रतिनिधी तसेच केंदूर ग्रामस्थांसोबत चर्चा करणार येणार आहे. याबाबत नेमका प्रश्न काय आहे याबाबत कार्यक्षेत्र अधिकारी मंजुश्री शेवाळे यांना सूचना केलेली असून योग्य त्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला जाईल.
- संजीव देशमुख, एमआयडीसी, पुणे प्रादेशिक विभागाचे अधिकारी
दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या प्रकाराने संपूर्ण ठाकरवाडी भयभीत होते. संपूर्ण केंदूर ग्रामस्थ या १०३ आदिवासी कुटुंबाच्या लढ्यात एकदिलाने सहभागी होत आहेत. शासन, एमआयडीसी वा एसईझेड कंपनी यापैकी कुणीही निर्णय घ्यावा पण या कुटुंबांना घरांसाठी जागाच नव्हे तर घरेही द्यावेत. यासाठी आमच्या गावचा पाठपुरावा सुरू आहे.
सूर्यकांत थिटे, सरपंच, केंदूर