बुरुंजवाडी अखेर शिक्रापूर ठाण्यात वर्ग

बुरुंजवाडी अखेर शिक्रापूर ठाण्यात वर्ग

शिक्रापूर, ता. ३ : आठ वर्षांपूर्वी संपूर्ण गावाचा नकार असतानाही १८ किलोमीटर दूर असलेल्या रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत समावेश केलेल्या बुरुंजवाडी (ता. शिरूर) गावाने नऊ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी अखेर शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीत आपला समावेश करून घेतला.
आठ वर्षांपूर्वी (सन २०१४) रांजणगाव पोलिस ठाणे सुरू होताना शिक्रापूर हद्दीतील १६ गावे रांजणगाव हद्दीत वर्ग केली. खरेतर गावाचा होकार, अंतर आदींची माहिती निर्णयापूर्वी पोलिस प्रशासनाने घ्यायला हवी होती. मात्र, ते काहीच झाले नाही. अर्थात वरुडे आणि कोंढापुरी यांनी काही वर्षांपूर्वी दबाव वाढवून निर्णय बदलवून घेतला गेला होता. मात्र, बुरुंजवाडीकरांना कुणीच दाद देत नव्हते. तुमचे राजपत्र तयार झालेय, त्यामुळे शक्य नसल्याचे सगळीकडून सांगितले गेले.
अखेर सरकार बदलले आणि सरपंच नानासाहेब रुके, उपसरपंच अश्विनी नळकांडे, विजयराज टेमगिरे, कामगार आघाडीचे जयेश शिंदे व कार्यकर्त्यांनी नेटानी प्रयत्न सुरू ठेवत ग्रामपंचायत, ग्रामसभा, पोलिस अधिक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल कार्यालय, असे प्रयत्न सुरू ठेवले आणि नुकतेच बुरुंजवाडी गाव शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीत वर्ग केल्याचे राजपत्र जारी झाले.
बुरुंजवाडी ही शिक्रापूरची वाडी, तर रांजणगाव १८ किलोमीटर दूर आहे. त्यामुळे संपूर्ण गाव पोलिसी सेवेच्या दूरत्वाने हैराण होते. मात्र, संपूर्ण गावच्या प्रयत्नाने आम्ही अखेर राजपत्र बदलण्यात यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया सरपंच नानासाहेब रुके यांनी दिली.
दरम्यान, वाघाळे व गणेगावच्या ग्रामस्थांचीही शिक्रापुरात समावेश करण्याची मागणी आहे. त्याबाबत कागदोपत्री पाठपुरावा सुरू असल्याचेही रांजणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले.

शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीत बुरुंजवाडीचा समावेश केल्याबद्दलचे आदेश झाले असून, त्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल.
- प्रमोद क्षीरसागर, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com