
शितपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार
शिक्रापूर, ता. १० : फोटोचे कारण सांगत महिलेच्या घरी गेलेल्या शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सूर्यकांत शिर्के या फोटोग्राफरने संबंधित महिलेला शितपेयातून गुंगीचे औषध दिले व बलात्कार करून त्याचे फोटो शूटिंगही केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हे सर्व फोटो शूटिंग दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कारही केला.
शिक्रापूर परिसरात नोकरीच्या निमित्ताने आलेल्या पीडित महिलेची शिर्के याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यातून तो जून २०२१ मध्ये या महिलेच्या घरी गेला व त्याने शितपेयातून तिला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर महिला बेशुद्ध पडताच तिच्यावर बलात्कार करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. पुढील काळात त्याने हे चित्रीकरण तिला दाखवून ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून महिलेने जानेवारी २०२३ नंतर आपले राहते घर बदलले. तरीही शिर्के याचा त्रास काही कमी झाला नाही. अखेर तिने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फौजदार माधुरी झेंडगे यांनी आरोपी शिर्के यास तत्काळ अटक केली व शिरूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्याच्याच पत्नीच्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे फोटो काढून ते ती राहत असलेल्या पुण्यातील सोसायटीत टाकणारा शिर्के हाच होता. या प्रकरणात त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्याचा हा गंभीर प्रकार पुढे आला.
दरम्यान, फोटोग्राफरची प्रतिमा मलिन करणाऱ्या शिर्के याच्यामुळे हा व्यवसाय बदनाम होऊ शकतो. त्यामुळे शिक्रापूर फोटोग्राफर असोसिएशन याबाबत गंभीर असून, अशा प्रवृत्ती फोफावू नयेत व फोटोग्राफरबद्दल स्त्रीवर्गाचा विश्वास दृढ व्हावा म्हणून आम्ही तत्काळ आमच्या संघटनेतून त्याला बाहेर काढत असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीन प्रकाश चव्हाण यांनी दिली.