
जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांचा राजीनामा
शिक्रापूर, ता. २० : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षा केशरताई सदाशिव पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला. अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपला राजीनामा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे दिला.
सन २००० मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा दूध उत्पादक संघात गेलेल्या केशरताई यांनी मागील वर्षी झालेली मार्चमधील निवडणूक चौथ्यांदा जिंकली. जिल्ह्यातील एकूण ७०२ मतांपैकी तब्बल ५४८ एवढी म्हणजेच ७८ टक्के मते पदरात पाडून त्यांचा विजय चर्चेचा ठरला होता. यावेळी त्यांना शिरूर तालुका प्रतिनिधी म्हणून सुरवातीला जाहीर करून अचानक जिल्ह्यातून महिला मतदार संघात लढायला लावूनही त्यांचा विजय व मताधिक्य लक्षवेधी ठरले होते. या पार्श्वभूमिवर त्यांना एप्रिल-२०२२ मध्ये पहिल्या महिला अध्यक्ष करण्याचा एक वर्षासाठीचा मान अजित पवार यांनी दिला. आपला कार्यकाल संपताच त्यांनी आपला राजीनामा दिला. दरम्यान, सन २०१६ मध्ये त्यांना उपाध्यक्षपदाचीही संधी दिली गेली होती, तर पाच महिन्यांपूर्वी त्यांना ‘महानंद’चे संचालकपदही पक्षाकडून दिले आहे.
दरम्यान, आपल्या कार्यकालात अत्यंत स्वच्छ कारभार करून कात्रजचा नावलौकीक, उत्पन्न, उलाढाल हे सर्व वाढविण्यात यश मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
ssociated Media Ids : KND23B02822