
इंद्रायणी नदीत काळेपाणी, जलपर्णी
कुरुळी, ता. १४ ः पिंपरी- चिंचवड शहरालगत असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नदीमध्ये सध्या मैलामिश्रित पाणी असल्याने पाण्यातील जलचर आणि स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इंद्रायणी नदीवर आळंदी आणि देहू ही दोन महत्त्वाची तीर्थ क्षेत्र आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठा पालखी सोहळा होणार असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक येथे येणार आहे. आषाढी वारी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे. इंद्रायणी नदी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून हवेली आणि खेड तालुक्याची जीवनदायिनी म्हणून तिची ओळख आहे. या नदीमध्ये सध्या रसायनयुक्त काळे पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. परिसरातील एमआयडीसीमधील कंपन्यांचे येणारे रसायनयुक्त पाणी नदीत मिश्रित होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे, कुरुळीच्या सरपंच कविता गायकवाड, मोईच्या सरपंच शीला रोकडे, निघोजेचे सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच अर्चना फलके, नम्रता येळवंडे
वारकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
उपाय योजनांची ग्रामस्थांकडून मागणी
जलपर्णीमुळे परिसरातील गावातील शेती देखील धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीमधील जलपर्णी, काळे प्रदूषित पाणी, परिसरातून येऊन मिळणारे सांडपाणी याबाबत संबंधित प्रशासनाने उपाय योजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात
पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक आळंदी आणि देहू येथे दाखल होतात. इतकेच नाही तर वारकरी आळंदीत आल्यावर हे पाणी देखील पितात. त्यामुळे या नदीच्या प्रदूषणावर तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
1107
Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00553 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..