
कार्यक्षम सरपंच अन् आदर्श माता
कार्यक्षम सरपंच अन् आदर्श माता
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महाळुंगे नगरीच्या विद्यमान कार्यक्षम सरपंच सौ. मंगलताई राजेंद्रदादा भोसले यांनी आपल्या दोन्ही मुलांना संस्काराबरोबर उच्च शिक्षण दिले. तसेच, औद्योगिक विकास आणि समृद्ध झालेल्या आपल्या गावासाठी अनेक पायाभूत विधायक कामे त्यांनी हाती घेतली आहेत.
स्त्री केवळ मायाळू नसून शक्ती, बुद्धी व सामर्थ्यवान असते, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आई आहे. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्या संस्कार देण्याचे सामर्थ्य केवळ आईमध्ये असते. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महाळुंगे नगरीच्या विद्यमान कार्यक्षम सरपंच सौ. मंगलताई राजेंद्रदादा भोसले यांनी आपल्या दोन्ही मुलांना संस्काराबरोबर उच्च शिक्षण दिले. तसेच, गावचे पालकत्व स्वीकारताना आपल्या पाल्यांकडे तेवढ्याच समर्थपणे लक्ष दिले. ‘धन्य ते अरण, रत्नाचीच खाण’ या उक्तीप्रमाणे आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी जातीने लक्ष दिले.
मंगलताई यांना शिक्षणाची आवड होता, मात्र परिस्थितीमुळे त्यांना स्वतःला उच्च शिक्षण घेता आले नाही. मात्र, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी आपल्या मुलांना पाचगणी या ठिकाणी पाठवले. मुलांनीही त्यांच्या कष्टाची जाण ठेवली.
मंगलताईंचा मोठा मुलगा अभय याने कॅनडामधून एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली असून, तो सध्या तिथेच उच्च पदावर काम करत आहे. धाकटा मुलगा प्रथमेश हा सध्या यूकेमध्ये बीबीएचे शिक्षण घेत असून, पुढील उच्च शिक्षण घेण्याची त्याची मनीषा आहे. शिक्षणाबरोबर दोन्ही मुले उत्तम फुटबॉलपटूही आहेत.
मंगलताई या सध्या श्रीक्षेत्र महाळुंगे नगरीच्या सरपंचपद भूषवीत आहेत. औद्योगिक विकास आणि समृद्ध झालेल्या या गावासाठी अनेक पायाभूत विधायक कामे त्यांनी हाती घेतली आहेत. विशेषतः गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी सुसज्ज इमारत उभी करणे, हा त्यांचा मानस आहे. सुसंस्कृत नागरिक हा ज्ञानमंदिरातच आकाराला येतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. गावातील सुसज्ज रस्ते व सांडपाणी व्यवस्था विल्हेवाट लावणे. गावातील लोकसंख्येस उपयुक्त होईल, अशी ५० लाख लिटरची पाण्याची टाकी बांधणे. गावातील धार्मिक स्थळे विशेषतः आराध्य दैवत श्रीपतीबाबा महाराज मंदिर व भैरवनाथ महाराज देवस्थानचे पावित्र्य राखून पायाभूत सुविधा निर्माण करणे, आदी उद्दिष्टे त्यांनी डोळ्यासमोर ठेवली आहेत. मुलांच्या विकासाबरोबर आता गावचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले आहे.
मंगलताई यांच्या या संपूर्ण प्रवासात व राजकीय सामाजिक जीवनात त्यांचे पती व खेड तालुक्यातील उद्योजक राजेंद्रदादा भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे, हे त्या नम्रपणे नमूद करतात. मंगलताई सांगतात, शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये चारित्र्य व संस्काराची पेरणी व्हायला हवी. सुसंस्कृत संतती हीच खरी पालकांची संपत्ती असते. मुलांना शिक्षण देताना पाय जमिनीवर ठेवून आकाशाला गवसणी घालण्याची ताकद व सामर्थ्य निर्माण करणे गरजेचे आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00617 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..