शिलालेखातून म्हाळुंगे इंगळेचा इतिहास उजेडात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिलालेखातून म्हाळुंगे इंगळेचा इतिहास उजेडात
शिलालेखातून म्हाळुंगे इंगळेचा इतिहास उजेडात

शिलालेखातून म्हाळुंगे इंगळेचा इतिहास उजेडात

sakal_logo
By

कुरुळी, ता. २५ ः म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) गावाला असलेला ऐतिहासिक वारसा शिलालेख वाचनातून उजेडात आला आहे. म्हाळुंगे येथील ३ शिलालेखांचे वाचन नुकतेच इतिदास अभ्यासक अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. गावात तीन शिलालेख आहेत. यातील एक गावाच्या मुख्य वेशीशेजारी असलेल्या चौरसाकृती बारवेवर पायऱ्या उतरताना उजव्या बाजूस आहे.
दुसरा गावाच्या वेशीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंगळे घराणे यांची कुलदेवता काळकुबाई मंदिराशेजारी असलेल्या धरण बंधाऱ्याच्या भिंतीवरही शिलालेख आहे. तर तिसरा म्हाळुंगे गावाच्या वेशीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंगळे घराण्याच्या ग्रामदेवता पानहाली आई मंदिराशेजारी असलेल्या धरण बंधाऱ्याच्या भिंतीवर मध्यभागी वरच्या बाजूस एक शिलालेख आहे. शिलालेख संशोधन कार्यात भगवंतराव साहेबराव पाटील इंगळे इनामदार त्यांचे पुत्र सुरेंद्र इंगळे, प्रवीण भोसले, प्रसाद शिंदे यांनी सहकार्य केले.

मोडी कागदपत्रे, नाणी उपलब्ध
या गावचे मूळ रहिवासी राजेश्री सरदार राघोजी इंगळे होत. त्यांच्या पुढील पिढ्यांनी स्वराज्याची सेवा करत पराक्रम गाजवला. त्या पैकी वंश परंपरेने मूळ थोरले वंशज त्रिंबकजी व सटवोजी दोघे बंधू होत. त्रिंबकजी यांचे पुत्र अंबुजी इंगळे त्यांचे पुत्र दुसरे त्रिंबकजी इंगळे यांचा पुत्र मावजी यांच्याकडे म्हाळुंगे इंगळे गावची पाटीलकी होती. त्यांनी गावहिताची खूप सारी विधायक कार्य केली आहेत. सध्या त्यांचे पुढील पिढीतील मूळ शाखेचे थेट वंशज इनामदार भगवंतराव साहेबराव पाटील इंगळे इनामदार व त्यांचे सुपुत्र सुरेंद्र इंगळे पाटील इनामदार सध्या म्हाळुंगे इंगळे येथे राहतात. आजही त्यांच्याकडे घराण्याची जुनी वंशावळ, मोडी कागदपत्रे, घराण्याचा मूळ शिक्का, कट्यार, काही नाणी आहेत. तसेच घराण्याची सनद उपलब्ध आहे.

शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय
म्हाळुंगे इंगळे हे गाव पूर्वी गावापासून बाहेर १ किमी अंतरावर स्थायिक होते. आजही त्यांच्या खुणा मंदिरे काही घरे स्वरूपात तेथे आहेत. गावातील शेतीकरिता व पिण्याच्या पाण्याची सोय राजेश्री त्रिंबकजी इंगळे त्यांचे पुत्र मावजी व सटवाजी इंगळे या भावांनी १६९९मध्ये बारव व १७०१, १७२४ मध्ये दोन धरणे बांधून प्रत्यक्ष २१००१, ३१०० व ३००० रुपये खर्च करून धरणे तलाव, विहीरी, वेशी, मंदिरे बांधणे अशा प्रकारची जनहिताची कामे केली. या पाण्यावरच म्हाळुंगे इंगळे गावचा शिवार सुजलाम् सुफलाम् झाला.

शिलालेखाचे महत्त्व
उत्तर मराठेशाहीच्या कारकिर्दीतील नारायणगाव येथे एक धरण बांधल्याचीही नोंद आहे. त्याप्रमाणे म्हाळुंगे इंगळे गावात सरदार इंगळे यांनी धरणे बांधून एक लोक हिताचे चांगले सत्कृत्य, केलेले आहे. यावरून त्यांचे समाजाबद्दल असलेले सामाजिक भान, प्रेम, स्नेह, आपुलकी आणि समाजाबद्दलची भविष्यातील दूरदृष्टी त्यांनी शिलालेख स्वरूपात समाजासमोर कोरून ठेवणे हेच या शिलालेखाचे महत्त्व अधोरेखित करते.

घराण्याची ओळख
सरदार इंगळे घराणे शिवपूर्व काळापासूनच एक मातब्बर घराणे म्हणून प्रसिद्ध होते. सरदार इंगळे घराणे हे मूळचे बुलडाणा जिल्हा चिखली तालुक्यातील करवंड गावचे. करवंड गावी इंगळे घराण्याची भव्य गढी असून सध्या भग्नावस्थेत आहे. इंगळे घराण्याचे नातेसंबंध थेट भोसले घराण्याशी होते. घराण्यातील गुणवंताबाईसाहेब या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राणीसरकार होत्या. तसेच तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांचा विवाह इंगळे घराण्यातील दिपाबाईसाहेब यांच्याशी झाला होता. आदिलशाही दरबारातील एक वजनदार घराणे म्हणून सरदार इंगळेंची कीर्ती सर्वदूर होती. इंगळे घराण्याला जंगबहाद्दर हा किताब आहे. शहाजीराजे भोसले यांच्यासोबत राहून या घराण्याने बरीच तलवार गाजवली.


शिवकालीन नाणे

इंगळे घराण्याची जुनी वंशावळ
भिंतीवर मोडी लिपीत लिहिलेली अक्षरे