
निघोजेत वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
कुरुळी, ता.४: निघोजे (ता.खेड) दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.२) सकाळी पावणे नऊ वाजता डोंगर वस्ती, निघोजे येथे घडला. कल्पना भूपाल गडेकर (वय ३४, रा. खराबवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी विष्णू बळिराम लोखंडे (वय ३६, रा. निगडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची मैत्रीण कल्पना गाडेकर या त्यांच्या दुचाकीवरून बाणेर येथून खराबवाडी येथे जात होत्या. निघोजेमधील डोंगरवस्ती येथे त्या आल्या असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने कल्पना यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.