
किसान मोर्चाचे उद्यापासून धरणे
कुरकुंभ, ता. ३ : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असून, काही कारखाने बंद झाले. मात्र, तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा ५० लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. अतिरिक्त उसाच्या गाळपाची मागणी भाजप किसान मोर्चाने वारंवार करूनही नियोजन करता न येणे हे सरकारचे अपयश आहे. या उसाचे तातडीने गाळप व्हावे व इतर मागण्यांसाठी किसान मोर्चाच्यावतीने ५ मेपासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिला.
राज्यातील या गाळप हंगामातील चालू साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा अतिरिक्त ऊस शिल्लक आहे. त्याच्या गाळपाचे नियोजन करावे, यासाठी किसान मोर्चा एक महिन्यापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे. तरीही अतिरिक्त उसाच्या गाळपाचे नियोजन व एकरकमी एफआरपीकडे राज्य सरकार व साखरसम्राट यांनी दुर्लक्ष केले. हे प्रश्न मार्गी न लावता येणे राज्य सरकारचे अपयश आहे. फेब्रुवारीत गाळप होणार ऊस मे महिना सुरू झाला तरीही शेतात उभा आहे. त्यामुळे उसाचे वजन मोठ्या प्रमाणात घट आहे. तीव्र उष्णता, भारनियमन पाण्याची कमतरतेमुळे ऊस जगविणे अवघड झाले आहे. स्वतः ऊस तोडून कारखान्यावर आणावा, असे कारखान्यांकडून सांगणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकार व कारखान्याच्या जाचाला ऊस उत्पादक शेतकरी कंटाळले आहेत, असे काळे यांनी सांगितले.
अतिरिक्त उसाचे नियोजन, वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून कपात न करता तो सरकार व साखर कारखान्यांनी द्यावा. ऊस जळीत, ऊसतोडणी उशिरा झाल्याबद्दल उसाला प्रती हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे. शिल्लक उसाचे पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी भाजप किसान मोर्चाने आक्रमक भूमिका घेऊन सरकारला जाग आण्यासाठी किसान मोर्चाच्यावतीने ५ मेपासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.
- वासुदेव काळे,
प्रदेशाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा
Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00399 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..