
दौंड तालुक्यात अवैद्य धंद्याना वाव
कुरकुंभ, ता. २७ : कुरकुंभ (ता. दौंड) दौंड तालुक्यातील कुरकुंभ व रावणगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गावठी, देशी दारू, मटका, जुगार, बंगार, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल व केमिकल चोरी असे अवैधधंदे खुलेआम सुरू आहेत. त्याच्यात भर म्हणून खडकी येथील विद्येचे मंदिर असलेल्या जिल्हा परिषद शाळेपासून काही अंतरावर खुलेआम गावठी दारूविक्री केली जात आहे. दारूच्या नशेत होणाऱ्या शिवीगाळीमुळे विद्यार्थी, शिक्षक, महिलांची कुचंबणा व त्रास होत आहे. राजकीय वरदहस्त व अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.
परिसरातील कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी या पोलिस मदत केंद्रामध्ये एक अधिकारी व काही पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. दौंड पोलिस चौकीतंर्गत कुरकुंभ व रावणगाव पोलिस मदत केंद्रांचा समावेश आहे.
या दोन्ही मदत केंद्रांतर्गतील गावांमध्ये गावठी, देशी दारू विक्री, मटका, जुगार इत्यादी अवैधधंदे सुरू आहेत. तसेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचे ढाबे व हॉटेलमध्ये दारूविक्री केली जाते.
तसेच, वाहनांमधून खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, लोखंड चोरी केली जाते. एमआयडीसीतील कंपन्यांमधील भंगार, केमिकल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वरील अवैध धंद्यामध्ये रोजची लाखोंची उलाढाल होत आहे. त्रास होऊनही सर्वसामान्य नागरिक अवैध धंदेवाल्यांचा पोलिसांबरोबर असणारा वावर व भीतीमुळे तक्रार करण्यास घाबरत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00444 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..