
सायलेन्सर चोरट्यांकडून आणखी चोऱ्यांची कबुली
लोणी काळभोर, ता. २८ : मारुती सुझुकी कंपनीच्या ईको मोटारींचे सायलेन्सर चोरीप्रकरणी जेरबंद केलेल्या शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (वय २१) व राम राजेश ढोले (वय २०, दोघेही रा. आळंदी, ता. खेड), या दोन चोरट्यांनी विमानतळ, येरवडा, सासवड, हडपसर, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणखी नऊ ठिकाणी सायलेन्सर चोरी केल्याची कबुली दिली आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध शाखेचे पथक गस्त घालत असताना पोलिस अंमलदार संभाजी देविकर यांना शनिवारी (ता. १६) एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सायलेन्सर चोरणारे चोरटे हे उरुळी देवाची येथे येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, त्यांच्याजवळ असलेली व गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट मोटार व चोरलेल्या एकूण १४ सायलेन्सरच्या कनव्हर्टरमधील धातुमिश्रित चुरा, असा ३ लाख ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपासाकामी १० दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. त्यानुसार त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ९ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, सायलेन्सरमधील कॅथॅलीक कन्व्हर्टरमधील धातुमिश्रित पार्टचा चुरा काढून आरोपी शहाबाज खान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यास विक्री करत असल्याचे निष्पण झाले. पोलिस त्याचा शोध घेत आहोत.
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03290 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..