
सहा जणांना दुहेरी जन्मठेप
लोणी काळभोर, ता. ५ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड आप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहाजणांना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यातून गोरख कानकाटे याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता झाली आहे.
आरोपी संतोष मिनराव शिंदे (वय ३४, रा. शिंदवणे, ता. हवेली), नीलेश खंडू सोलनकर (वय ३०, रा. डाळिंब दत्तवाडी, ता. हवेली) राजेंद्र विजय गायकवाड (वय २४, रा. शिंदवणे, ता. हवेली),आकाश सुनील महाडीक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), विष्णू यशवंत जाधव (वय ३७, रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) आणि नागेश लखन झाडकर (वय २७, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नितीन महादेव मोगल (वय २७), मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा (वय ४५, रा. येरवडा, मूळ रा. रामपूर जि. वारंगल, राज्य आंध्रप्रदेश), विकास प्रभाकर यादव (वय ३१, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), गोरख बबन कानकाटे (रा. कोरेगाव मूळ इमानदारवस्ती, ता. हवेली), आण्णा उर्फ बबडया किसन गवारी (रा. मेमाणेवाडी, ता. दौंड), प्रमोद ऊर्फ बापू काळूराम कांचन, सोमनाथ काळूराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड (रा. तिघेही उरुळी कांचन, ता. हवेली), प्रवीण मारुती कुंजीर (रा. वळती, ता. हवेली) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातून गोरख कानकाटे याची सुटका झाली असली तरी तो यापूर्वीच आप्पा लोंढे याच्या भावाच्या खुनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी ४२ साक्षीदार तपासले. पोलिसांनी नोंदविलेले कबुली जबाब, बॅलेस्टीक तज्ञ डॉ. कुतुबुद्दीन मुलाणी यांची साक्ष आणि शव विच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींना अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. शाह यांनी केला. फिर्यादितर्फे ॲड. सुहास कोल्हे यांनी काम पाहिले. गुन्हेगारांनी सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
खुनाची घटना २०१५ मधील
कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याचा २८ मे २०१५ रोजी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोड रस्त्यावर पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडले असताना खून झाला होता. घरापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या छातीत व पोटात शिरल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
लोंढेवर पन्नासहून अधिक गुन्हे
अप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली होती. २००२ मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता.
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03305 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..