
पावसाने दडी मारल्याने पेरण्या रखडल्या
लोणी काळभोर, ता. २९ : पूर्व हवेलीसह जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. मृग नक्षत्राची सुरूवात झाली परंतु मॉन्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळिराजासह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. जून महिना अखेरीस आला तरी पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे बळिराजा हवालदिल झाला आहे. शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मॉन्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याचा वेध घेत काही शेतकऱ्यांनी विहिरीतील मुबलक पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. दरवर्षी मृग नक्षत्र सुरू होताच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज होत असतो.
मात्र अजूनही काही शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून यंदा मॉन्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामाला प्राधान्य देऊन नांगरणी, वखरणी, रोटावेटर करून उन्हाची पर्वा न करता घाम गाळून पेरणीसाठी जमीन सज्ज केली. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांचे जास्त लक्ष असते.
दरम्यान, पेरणीयोग्य जोरदार पाऊस पडल्यानंतरच पेरण्या करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे. दुबार पेरण्यांचे संकट टाळण्यासाठी शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, पाऊस सातत्याने शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. यंदा चांगल्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असले तरी पावसाचे सातत्य व सर्वच भागात सारख्या उपस्थितीचा अभाव शेतकऱ्यांची चिंता वाढवताना दिसत आहे.
''बियाणांची एक्सपायरी डेट बघून घ्या''
बियाणे, खत खरेदी करताना नेहमी अधिकृत विक्रेत्याकडून घेतले पाहिजे. जो त्यांच्या प्रोडक्टची हमी देईल. हे सगळं खरेदी करताना त्याची पावती नक्की घ्या. पेरणी झाल्यानंतरही बियाण्याच्या पिशव्या, टॅग, पावती, थोडे बियाणे सांभाळून ठेवा. बियाणे खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट बघून घ्या. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद आहे की नाही याची खात्री करून घ्या, अशा प्रकारे सावधानता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील असा अंदाज वेधशाळेने तसेच स्कायमेट ने दिला होता. तरीही अजूनही जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी पेरणी करण्यासाठी व पुढील आर्थिक वर्षाचे म्हणजे पीकपाण्याचे नियोजन कसे करायचं या संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष आहे. पाऊस चांगल्या प्रकारे पडतोय का याच विचारात शेतकरी पडला आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03365 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..