ओल्या बाळंतिणीसह बाळाची फरफट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओल्या बाळंतिणीसह बाळाची फरफट
ओल्या बाळंतिणीसह बाळाची फरफट

ओल्या बाळंतिणीसह बाळाची फरफट

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १३ ः आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील तीन दिवसाची ओली बाळंतीण व तिच्या तीन दिवसाच्या मुलाला उपचार मिळावेत यासाठी कुंजीरवाडी, ससून यासारख्या शासकीय रुग्णालयाचे उंबरे झिजवावे लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
भर पावसात ओली बाळंतीण व तिचे तीन दिवसाचे बाळ ससून, कुंजीरवाडी यासारख्या शासकीय रुग्णालयाच्या दारात उपचारासाठी फिरत होते, दोन्ही रुग्णालयांत मुलाच्या उपचारासाठी जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर शिवसेनेचे विभाग प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी या प्रकरणात मदत केल्यानंतर तब्बल बहात्तर तासानंतर ओली बाळंतीण व तिच्या तीन दिवसाच्या मुलावर औंध येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु झाले.
रुक्मिणी शिवाजी पात्रे हे हालअपेष्टा झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन, या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी स्वप्नील कुंजीर यांनी केली आहे. आळंदी म्हातोबाची हद्दीतील कोळस्कर वस्तीवर नामदेव देढे व त्यांचे वडील व आई मागील वीस वर्षापासून राहतात. नामदेव देढे याची मोठी बहिण रुक्मिणी शिवाजी पात्रे गरोदर असल्यामुळे बाळंतपणासाठी देढे यांच्याकडे आली होती. रुक्मिणीला सातवा महिन्यातच कळा येऊ लागल्या होत्या. भर पावसात रुक्मिणीला दवाखान्यात नेण्यासाठी चार चारचाकी वाहन नसल्याने, आसपासच्या महिलांनी घरीच बाळंतपण केले. सातव्या महिन्यातच बाळंतपण झाल्याने, बाळाचे वजन कमी भरले. यामुळे बाळ व आईला उपचाराची गरज असल्याने, देढे कुटुंबीयांनी ओली बाळंतीण व तिच्या बाळाला कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नेले. मात्र, त्या ठिकाणी बाळाला ठेवण्यासाठी काचेची पेटी नसल्याने, तेथील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी ससूनला घेऊन जावे लागेल असे सांगितले.
दरम्यान, बाळ वाचवणे गरजेचे असल्याने, देढे कुटुंबीयांनी मध्यरात्रीच्या सुमारास मिळेल त्या वाहनाने पुण्यातील ससून गाठले. परंतु. ससूनमध्येही बाळासाठी आयसीयू बेड शिल्लक नाही असे सांगत तेथील कर्मचाऱ्यांनी परत पाठवून दिले. नवजात बालकास जीवन मृत्यूची लढाई लढण्यासाठी अखेर नाइलाजाने घरी आणावे लागले. दोन दिवसांपासून हे बाळ घरीच होते. पण ते काहीच खात-पीत नाही आणि घरी राहिले तर जास्त काळ टिकणार नाही. याची जाणीव होताच रुक्मिणीचा भाऊ नामदेव देढे व मजूर कुटुंबीयांनी स्वप्नील कुंजीर यांचे घर गाठले. त्यांच्याकडे मदत मदत मागितली. कुंजीर यांनी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे यांच्या मदतीने पुण्यातील औंध रुग्णालयात दाखल केले.

रुक्मिणी पात्रे या बाळासह उपचारासाठी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळावर उपचार करण्याची सुविधा नसल्याने, आमच्या रुग्णवाहिकेतून ससून व औंध रुग्णालयात पाठवले होते. मात्र नवजात बालकावर उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने, परत पाठवले होते. शेवटी आज दुपारी औंध येथे जागा मिळवण्यात यश आले आहे.
-डॉ. मेहबूब लकडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03396 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..