‘हिरकणी’ने परतवला बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हिरकणी’ने परतवला बिबट्याचा हल्ला
‘हिरकणी’ने परतवला बिबट्याचा हल्ला

‘हिरकणी’ने परतवला बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By

मंचर, ता. ५ : आदर्शगाव कुरवंडी (ता. आंबेगाव) येथे घराबाहेर बांधलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार करून बिबट्याचा हल्ला परतवून लावला. कलाबाई देविदास मते (वय ४१) या बहाद्दर महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, त्यांच्या डोक्यावर टाके पडले आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मते यांच्या घराजवळ वन विभाग आहे. रविवारी (ता. ४) संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेल्या. बिबट्या तेथे दबा धरून बसलेला होता. बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. कुटुंबीयांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. उपचार घेऊन त्यांना घरी आणले. त्यांचे डोके दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले. डोक्याला खोल जखम असून, सहा टाके पडल्याची माहिती डॉ. श्वेता गोराने व डॉ. सचिन कांबळे यांनी दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौंधळ, वनपाल एस. एल. गायकवाड, वनरक्षक एस. बी. वाजे, वनरक्षक ए. एस. होले, आर. सी. शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच मनीषा तोत्रे, जितेंद्र माळुजे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, रवींद्र तोत्रे, कैलास तोत्रे, ग्रामपंचायत सदस्य दगडू मते, बंडू मते, रामदास तोत्रे, अंकुश तोत्रे, भगवान चव्हाण, सुनील तोत्रे आदी ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याबाबत चर्चा केली.

पिंजरा लावण्याची मागणी
आदर्शगाव कुरवंडी येथे पाच दिवसांपूर्वी अंकुश तुळशीराम तोत्रे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने झडप टाकली होती. परंतु, सुदैवाने कुत्र्याचा बचाव झाला. परिसरात बिबट्याचे उपद्रव वाढत आहेत. बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पडला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच मनीषा तोत्रे यांनी केली. दरम्यान, वन खात्यामार्फत पिंजरा लावला जाईल, अशी माहिती वनपाल संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03662 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..