मंचरमध्ये तरुणाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरमध्ये तरुणाचा खून
मंचरमध्ये तरुणाचा खून

मंचरमध्ये तरुणाचा खून

sakal_logo
By

मंचर, ता. २१ : मोरडेवाडी-मंचर (ता. आंबेगाव) येथील गौरव शिवाजी राजगुरू (वय २९) या तरुणाचा खून झाल्याचे
निष्पन्न झाले असून, मंचर पोलिसांनी ४८ तासांत खुनाचा उलगडा करून दोन आरोपींना शुक्रवारी (ता. २१) जेरबंद केले.
अरीफ अजीज कुरेशी (रा. जमादार गल्ली, मंचर), संत्या ऊर्फ संतोष नारायण सकत (रा. धामणखेल, ता. जुन्नर; मूळ रा. सांगवी त्रिरत्ननगर, जि. नांदेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गौरव याचा भाऊ शुभम याला डेंगी झाल्यामुळे मंचर सी.टी. हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यामुळे त्यांचे वडील शिवाजी राजगुरू हे हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना मुलगी प्रिया हिची मैत्रीण प्रमिला यांचा फोन आला. तिने सांगितले की, मोबाईलवर एक व्हिडिओ आला आहे. त्यामध्ये एक अनोळखी मुलगा मंचर येथील उपजिल्हा रूग्णालय येथे ॲडमिट आहे, तो गौरव याच्यासारखा दिसत आहे. तुम्ही उपजिल्हा रूग्णालयात जाऊन खात्री करा. त्यानुसार शिवाजी राजगुरू व त्यांची पत्नी सुनीता, मुलगी प्रिया तिघे उपजिल्हा रूग्णालयात गेले. त्यावेळी गौरव याच्या डोक्याला ड्रेसिंग केलेले होते. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, त्यास पहाटे कोणीतरी उपचारकामी रुग्णालयात आणले होते. उपचारादरम्यान संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. हे एकूण राजगुरू कुटुंबीयांना धक्का बसला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले.
दरम्यान, पोलिसांनी मंचर शहरातील सी.सी.टीव्ही. फुटेजची तपासणी केली. त्यात लक्ष्मीरोड, एम.जी. मार्केटजवळील न्यू हाय फॅशन कपड्यांच्या दुकानाजवळील गल्लीत गौरव याला दोघेजण दगडाने व लाथाबुक्यांनी मारहाण करत असल्याचे आढळून आले. शिवाजी राजगुरू यांनी अरीफ कुरेशी व संत्या ऊर्फ संतोष सकत या दोन्ही आरोपींना ओळखले. सरकारी पक्षातर्फे पोलिस नाईक तानाजी हगवणे यांनी गुरुवारी (ता. २०) फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सतीष होडगर, सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, राजेश नलावडे, नंदकुमार आढारी, तानाजी हगवणे यांनी केला. आरोपींना जुन्नर तालुक्यातून अटक केली आहे. आरोपींना शुक्रवारी (ता. २१) घोडेगाव न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. २५) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. खुनाचे कारण समजले नाही.