ज्येष्ठाला फसवून मध्यस्थानेच लाटली जमीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठाला फसवून मध्यस्थानेच लाटली जमीन
ज्येष्ठाला फसवून मध्यस्थानेच लाटली जमीन

ज्येष्ठाला फसवून मध्यस्थानेच लाटली जमीन

sakal_logo
By

मंचर, ता. ३१ : ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर सात वर्षांपूर्वी ११ गुंठे जमीन खरेदीखताने नावावर झाली. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्याने परस्पर जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. त्यानंतर जमीन दुसऱ्याला विकली. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याबद्दल रमेश भीमसेन चासकर (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा मंचर पोलिस ठाण्यात दाखल झाला.
याबाबत ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण गणपत खामकर (वय ७५, रा. पनवेल, रायगड) यांनी मंचर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांची मेहुणे सुदाम खेडकर यांच्या माध्यमातून जमिनी खरेदी विक्रीची कामे करणारा रमेश भीमसेन चासकर यांच्याशी ओळख झाली होती. अवसरी खुर्द येथील कैलास गणपत अभंग व निर्मला कैलास अभंग यांच्याकडून स.न. ५८/५ मधील ३३ गुंठे जमीन बाळकृष्ण खामकर व रमेश चासकर यांनी एकत्र खरेदी केली. त्यामध्ये खामकर यांची ११ गुंठे जमीन होती. १५ मे २०१५ रोजी ११ गुंठे जमिनीचा सातबारा खामकर यांच्या नावावर झाला. ते मुंबईला राहत असल्याने व ज्येष्ठ असल्याने त्यांना जमिनीकडे लक्ष देता आले नाही.
दरम्यान, १५ मे २०२२ रोजी खामकर हे मेहुणे सुदाम खेडकर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी अवसरी खुर्द येथे आले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या नावे असलेली ११ गुंठे जमीन ही रमेश चासकर याने त्याच्या नावावर करून घेतली. त्यानंतर ती जमीन रमेश नानाभाऊ बोऱ्हाडे (रा. लोणी, ता. आंबेगाव) यांना विक्री केली असून, त्याचा दस्त सन २०१९ मध्ये झाल्याचे समजले. त्यांनी यासंदर्भात वारंवार चासकर यांना विचारले. मात्र, त्यांनी सदर जमीन माझ्या नावावर कशी झाली, हे मला माहीत नाही, असे उडवाउडवीचे उत्तर दिले.